"मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...! 

"मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...! 

जळगाव - भक्तिगीत, भावगीतांनी निर्माण केलेले पवित्र वातावरण... शास्त्रीय गीतांनी चढविलेला साज... अन्‌ मराठी- हिंदी गीतांच्या भन्नाट मैफलीने आज जळगावकरांना अक्षरश: वेड लावले. "मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे..', "स्वरगंगेच्या काठावरती...', "हा छंद जिवाला लावी पिसे...' यांसारखी मराठीतील लोकप्रिय गीते सादर करून विख्यात गायक "सारेगमप फेम' मंगेश बोरगावकर यांनी ही मैफिल गाजवली. 

निमित्त होते- गुढीपाडव्यानिमित्त "सकाळ-मधुरांगण', "जैन इरिगेशन सिस्टिम्स' व "भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन फाउंडेशन' आयोजित "गाणे मंगेशाचे' या मैफलीचे. कांताई सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन व "सारेगमप फेम' मंगेश बोरगावकर, त्यांच्या पत्नी अपूर्वा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी "सकाळ'चे युनिट हेड संजय पागे, मुख्य बातमीदार सचिन जोशी उपस्थित होते. मैफलीत साथसंगत करणारे गायक ऋषिकेश शेलार, अबोली गटणे, संगीत संयोजक सौरभ कुलकर्णी यांच्यासह महेंद्र फुलपगार (रिदमिस्ट), विजय खिश्‍ती (तबला), विद्याधर तांबे (हार्मोनियम), सावन बोरडे (ऑक्‍टोपॅड), जयेश भालेराव (कि-बोर्ड), रोहित राजपूत (गिटार) व निवेदक राजेश मंचरे यांचा सत्कार करण्यात आला. 

मंगेशाच्या गीतांना रसिकांची दाद 
"गणेशवंदना', "गगन सदन तेजोमय...' या भक्तिगीतांनी रसिका नातूने मैफलीला सुरवात केली. यानंतर तिने गायलेल्या "या पंढरीचे सुख पाहता डोळा, उभा तो जिव्हाळा योगीयांचा...' या गीताने रसिकांवर प्रभाव टाकला. यानंतर मंगेश बोरगावकर यांनीही "येईओ विठ्ठल भक्‍तजन वत्सल...' हे भक्तिगीत सादर करून आवाजाची झलक दाखविली. यानंतर सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेले "त्या फुलांच्या गंधी कोणी सांग तू आहेस का...' हे भावगीत सादर करून अभिजात आवाजाची झलक दाखवली. यानंतर त्यांनी "बगळ्याची माळ फुले अजुनी अंबरात...', "मन उधाण वाऱ्याचे....' या गीतांना तर उत्तमपणे सादर करत रसिकांनाही सोबत घेऊन एक वेगळा रंग भरला. यासोबतच रसिकाने "दिस चार झाले मन पाखरू होऊन...', "मी राधिका- मी प्रेमिका...' या गीतांनी युवावर्गाच्या हृदयाचा ठोका घेतला. मंगेश बोरगावकर यांनी हिंदी- मराठीतील उत्तम गाण्यांची निवड या कार्यक्रमासाठी करत "स्वरगंगेच्या काठावरती...', "हा छंद जिवाला लावी पिसे...', "सूरमयी श्‍याम...' आदी गीते सादर करत मैफलीत रंग भरला. एकाहून एक दर्जेदार व लोकप्रिय गीतांनी ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. रसिकांच्या फर्माईशला मान देत मंगेश यांनी विविध गीते सादर केली. रसिकांमधील चिमुकल्या अदितीनेही मंगेश यांना एका गीतावर साथ दिली. राजेश मंचरे यांनी मैफलीचे शानदार संचलन केले. अमोल भट यांनी सूत्रसंचालन केले. 

पहला नशा... पहला खुमार...! 
मराठी गीतांसोबतच मंगेश यांनी हिंदी चित्रपट गीतेही तितक्‍याच दमदार पद्धतीने सादर केली. "पहला नशा... पहला खुमार...' या आमिर खानवर चित्रित गाण्याला रसिकांनी डोक्‍यावर घेतले. मंगेश यांनी रसिकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत हे गीत सादर केले; तर अलीकडच्या काळातील "बदलापूर' चित्रपटातील "हा सिखा मैने जिना जिना...' हे गाजलेले गीत सादर करून मंगेश यांनी मैफिल अक्षरश: जिंकली. 

ऋषिकेशच्या "सुफी' गीत अन्‌ रसिकाची लावणी 
कार्यक्रमादरम्यान ऋषिकेश शेलार या उमद्या गायकाने "तू माने या ना माने दिलदारा...' हे सुफी गीत अत्यंत दमदारपणे सादर केले. रसिकांनी या गाण्याला भरभरून दाद दिली. कार्यक्रमाच्या समारोप सत्रात रसिकाने सादर केलेल्या "मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा...' या लावणीने रसिकांना ठेका धरायला लावला. लावणीला रसिकांकडून "वन्स मोअर...' मिळाला. 

मान्यवरांनी घेतला आस्वाद 
कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी निशा जैन यांनी या मैफलीचा बराच वेळ थांबून आस्वाद घेतला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही कार्यक्रमास येऊन गीतांचा आनंद लुटला. गुढीपाडव्याची सायंकाळ रम्य व चैतन्यदायी करणाऱ्या "सकाळ'च्या या कार्यक्रमाबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com