युती, आघाडी स्वतंत्र लढण्याचे दावे पोकळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

जळगाव - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. युती आणि आघाडी करण्यावरून आता पक्षनेतृत्वात शह- काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. पक्षाचे नेते युती, आघाडी किंवा स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले, तरी ते ‘पोकळ’च असल्याचे दिसत आहे. खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांतील अंतर्गत वाद आणि नेतृत्वाचाच तिढा सोडविण्याचे खरे आव्हान आहे. 

जळगाव - महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. युती आणि आघाडी करण्यावरून आता पक्षनेतृत्वात शह- काटशहाचा खेळ सुरू झाला आहे. पक्षाचे नेते युती, आघाडी किंवा स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले, तरी ते ‘पोकळ’च असल्याचे दिसत आहे. खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांतील अंतर्गत वाद आणि नेतृत्वाचाच तिढा सोडविण्याचे खरे आव्हान आहे. 

महापालिकेतील सध्याची राजकीय स्थिती विचित्र आहे. महापालिकेत खानदेश विकास आघाडीचे बहुमत आहे. तर याच आघाडीच्या विरोधात लढा देऊन मनसेच्या चिन्हावर तब्बल तेरा नगरसेवक निवडून आणणारे ललित कोल्हे याच आघाडीच्या बळावर महापौर आहेत. मात्र, आगामी निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत त्यांचीच भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्याच निर्णयाबाबत संभ्रम आहे. तर आघाडीच्या विरोधात लढलेली राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका खानदेश विकास आघाडीच्या ‘बाजू’ची तर कधी विरोधात राहिली आहे. परंतु आता हीच ‘राष्ट्रवादी’ सोबत असून, आघाडीच्या बळावर त्यांनी महिला बालकल्याण सभापतिपदही मिळविले आहे. तर बहुमतात असलेल्या खानदेश विकास आघाडीने उपमहापौर, स्थायी समिती सभापतिपद आपल्याकडे ठेवले आहे. भाजप हा प्रमुख विरोधी  पक्ष आहे. 

पक्षीय नेतृत्वाबाबतही प्रश्‍नचिन्ह
महापालिकेतील पक्षीय नेतृत्वाचा विचार केल्यास खानदेश विकास आघाडीचे नेते सुरेशदादा जैन हे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत. महापौर ललित कोल्हे यांचा मनसे हा पक्ष असला तरी तो तांत्रिकदृष्ट्या कागदावरच आहे. त्यामुळे भविष्यात ते या पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्‍यता कमीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील आणि महापालिकेतील नेतृत्वात मोठा फरक आहे. या ठिकाणी जिल्हा नेतृत्वाचे महापालिकेतील सदस्य ऐकतीलच असे नाही किंवा महापालिकेतील नेत्यांचा सर्व सदस्य आदेश पाळतीलच असेही नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व महापालिकेत नसल्यासारखेच असल्याचे सांगण्यात येते. भाजप विरोधी पक्षात आहे. परंतु पक्षाचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन व खानदेश विकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे सख्य आहे. आघाडीचे नेते कायम महाजन यांच्या संपर्कात असतात, असेही सांगितले जाते. त्यामुळे महापालिकेतील भाजपचे सदस्य आणि भाजपचे जिल्ह्यातील नेतृत्व यांच्यातही सख्य नाही. भाजपमध्ये जिल्ह्यातील राजकारणात असलेल्या महाजन आणि खडसे गटाचा वाद महापालिकेतही असून, खडसे यांच्या गटाचे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनीच आगामी निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी नेतेही निरुत्तर झाले होते. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावातच फार कमी येत असल्यामुळे त्यांचेही महापालिकेतील गटाकडे फारसे लक्ष नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपही महापालिकेत नेतृत्वहीनच असल्याचे दिसत आहे.

‘युती’,‘आघाडी’ दावे नेत्यांकडूनच
महापालिकेतील खानदेश विकास आघाडीसह सर्वच पक्षाची आगामी निवडणुकीबाबत संभ्रमावस्था आहे. अशा स्थितीत दुसरीकडे नेत्यांकडूनच ‘युती’, ‘आघाडी’ आणि स्वतंत्र लढण्याचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महापालिकेत भाजप-सेनेच्या युतीचा दावा केलेला आहे. दुसरीकडे मात्र जैन यांचेच मित्र असलेले भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘महापौर’ भाजपचा असेल असे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी स्वतंत्र लढण्याबाबत सोईस्कर मौन राखले आहे. तरीही भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मात्र स्वतंत्र चिन्हावर लढण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खानदेश विकास आघाडीसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. तर खानदेश विकास आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या सुरेशदादा जैन यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी आगामी महापालिका निवडणुका चिन्हावर लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जैन यांची खानदेश विकास आघाडीच मैदानात राहणार की नाही? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिकेतील सध्याच्या या स्थितीत पक्षाचे नेते युती आणि आघाडीसह स्वतंत्र लढण्याचे दावे करीत असले तरी सर्वच पक्षाच्या नेत्यांना सद्या तरी आपल्या पक्षातील तिढा सोडविण्याचे आव्हान आहे.

Web Title: marathi news jalgaon news municipal corporation