प्रेयसीला पळवून नेण्यासाठी प्रियकराने चोरली दुचाकी 

गणेश पाटील 
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

गणेश कॉम्प्लेक्‍समधील कृषी केंद्रावरील सहकारी नितीन मुरलीधर धामणे (रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव) यांची दुचाकी (एमएच 15, बीबी 1983) दोन दिवसांपूर्वी दुकानासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्यामुळे नितीन धामणे यांनी पोलिसात तक्रार दिली.

चाळीसगाव : आपल्या प्रेयसीला पळवून नेण्यासाठी प्रियकराने दुचाकी चोरली व पुढे हा त्याचा व्यवसायच झाल्याने प्रियकर अट्टल चोरटा बनल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा प्रकार समोर आला आहे. याबाबत विजय बबन डोईफोडे (वय 24, रा. हंगेवाडी, अहमदनगर) याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. 

याबाबत वृत्त असे, की शहरातील गणेश कॉम्प्लेक्‍समधील कृषी केंद्रावरील सहकारी नितीन मुरलीधर धामणे (रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव) यांची दुचाकी (एमएच 15, बीबी 1983) दोन दिवसांपूर्वी दुकानासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्यामुळे नितीन धामणे यांनी पोलिसात तक्रार दिली.

या चोरीचा पोलिस तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी विजय बबन डोईफोडे याने दुचाकी चोरल्याचे समजले. त्यानुसार, त्याला अटक करून त्याच्याकडून माहिती मिळवली असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, विजय हा आपल्या प्रेयसीला पळवून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी त्याला पैशांची गरज असल्याने त्याने दुचाकी चोरली व त्यात तो यशस्वीही झाला. त्यानंतर दुचाकी चोरणे हा त्याचा जणू धंदाच बनला. त्याने आतपर्यंत पुणे, चाळीसगावसह इतर अन्य ठिकाणाहूनही दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या असून, आणखीन दुचाकी सापडण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Marathi news Jalgaon news thief in chalisgaon