ट्रकची दोन रिक्षांसह कारला धडक ; शिक्षिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सुसाट ट्रक महामार्गावर वाहनांना धडक देत महामार्गाच्या बारा फूटखालपर्यंत ओढत आला, महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडांना धडकला. ट्रक आल्याने गती नियंत्रणात येऊन रिक्षावर धडकला. ज्याठिकाणी ट्रक वेल्डिंग दुकानावर उतरला. त्याठिकाणी दोघे वेल्डिंगचे काम करीत होते. ते दोघेही थोडक्‍यात बचावले. अपघात घडताच परिसरातील रहिवाश्‍यांनी मदतीसाठी धाव घेत जखमींसह ट्रकचालकाला बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. 

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौक ते रिलायन्स पेट्रोल पंपादरम्यान धुळ्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकवरील चालकाला अचानक मिरगीचा झटका आल्याने ट्रकचे नियंत्रण सुटून दुचाकी, रिक्षा, कार आणि दुसऱ्या एका रिक्षाला धडक देत ट्रक महामार्गाखाली उतरला. शहरातील मलिकनगरजवळ सकाळी पावणेबारा वाजता झालेल्या या अपघातात जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला असून, ट्रकचालकासह पाच जण जखमी झाले. 

भरधाव वेगात आलेल्या ट्रकने एका मागून एका वाहनांना धडक देत थेट रहिवासी वस्तीच्या दिशेने उतरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. शनिवार (ता.24) रोजी भुसावळकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून या ट्रकने एका मागून एक वाहनांना धडक देत महामार्गाच्या खाली उतरला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा भरुन निघालेला चंदीगड पासिंगचा ट्रक क्र. (सी.जी.04.जेडी.6951) हा साडेअकरानंतर जळगावात दाखल झाला. अजिंठा चौक पार केल्यानंतर थोड्या अंतरावरच चालकाला मिरगीचा झटका आल्याने ट्रकवरील त्याचे नियंत्रण सुटले. या ट्रकने अगोदर शाळेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सायकलीस धडकण्याचा प्रयत्न केला. 

थोडक्‍यात बचावलेल्या विद्यार्थ्यांनंतर ट्रकच्या पुढे चालत असलेल्या शेख हमीद शेख बशीर यांच्या दुचाकीला (एमएच.12.सी.एस.3873) मागून धडक दिली. त्यानंतर इच्छादेवीकडून अंजिठा चौकाकडे जात असलेल्या रिक्षा क्र.(एमएच.19व्ही.5141) या रिक्षाला धडक झाली.

त्यानंतर या सुसाट ट्रकच्या धडकेत कारने (एमएच.03.के.8511) पुन्हा एक रिक्षा क्र. (एमएच.19.व्ही.7727) ही रिक्षा येऊन याच रिक्षाला ओढत नेऊन महामार्गावर रिक्षा उतरल्यावर ट्रक त्यावर उतरल्याची भीतीदायक परिस्थिती उद्भवली. हा अपघात पावणे बाराच्या सुमारास मलिकनगर बाँबे बेकरीच्या रांगेत झाला. 

झाडांनी अडवले संकट 

सुसाट ट्रक महामार्गावर वाहनांना धडक देत महामार्गाच्या बारा फूटखालपर्यंत ओढत आला, महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडांना धडकला. ट्रक आल्याने गती नियंत्रणात येऊन रिक्षावर धडकला. ज्याठिकाणी ट्रक वेल्डिंग दुकानावर उतरला. त्याठिकाणी दोघे वेल्डिंगचे काम करीत होते. ते दोघेही थोडक्‍यात बचावले. अपघात घडताच परिसरातील रहिवाश्‍यांनी मदतीसाठी धाव घेत जखमींसह ट्रकचालकाला बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. 

पाच जखमी, एक ठार 

या अपघातात रिक्षाचालक रामदास शिवाजी बोस (वय. 40,रा.रामेश्‍वर कॉलनी) रिक्षातील प्रवासी दत्तात्रय नारायण ठुसे (वय.52), दुचाकीस्वार शेख हमीद शेख बशीर (वय.35), जिल्हा परिषद शिक्षक अख्तर हुसेन उमर पिंजारी (वय.42) यांच्यासह ट्रकचालक राधेशाम गंगासागर जखमी झाला असून, अजिंठा चौकातून आदर्शनगरकडे जाणाऱ्या जिल्हापरिषदेच्या शिक्षिका सिमा नितीन कोष्टी(वय-28) यांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Marathi News Jalgaon News Truck Car Accident Teacher Dies