जि. प. अध्यक्ष बदलण्याचा प्रस्ताव नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

जळगाव - जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासन यांच्यातील असलेला वाद मिटलेला आहे. पक्षातील सदस्यांतही वाद नाहीत, असतील ते समपोचाराने मिटविले जातील; परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा पक्षाचा विचार नाही, तसा कोणताही प्रस्तावही नाही, असा स्पष्ट खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी चांगली तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव - जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशासन यांच्यातील असलेला वाद मिटलेला आहे. पक्षातील सदस्यांतही वाद नाहीत, असतील ते समपोचाराने मिटविले जातील; परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा पक्षाचा विचार नाही, तसा कोणताही प्रस्तावही नाही, असा स्पष्ट खुलासा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या विकासासाठी चांगली तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे, विशाल त्रिपाठी, सुभाष शौचे, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, की राज्यातील सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात जळगाव- असोदा उड्डाणपूल २० कोटी, खिरोदा-चिनावल खंडवा उड्डाण पुलासाठी २५ कोटी, धरणगाव - राजवड - पारोळा रस्त्यासाठी ६ लाख ३० हजार, मेहरगाव धुळे - अमळनेर रस्ता सुधारणेसाठी १५ लाख, पाळधी - अमळनेर शिंदेखडा रस्ता दुरुस्ती ७० हजार, एरंडोल- कल्याणहोळ मार्गाच्या दुरुस्तीसाठी १० लाख ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जळगावातील महत्त्वाचा असलेला शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या पुलाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील पाडळसरे सिंचन प्रकल्प, बंलून बंधारे यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

जि. प. अध्यक्ष बदलणार नाही
जिल्हा परिषद अध्यक्ष बदलण्याबाबतच्या सुरू असलेल्या वादाबाबत ते म्हणाले, की जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा पक्षाचा कोणताही प्रस्ताव नाही. प्रशासन आणि सदस्य यांच्यात वाद होता. तो आता संपला आहे. पक्षाच्या सदस्यांच्या बाबतीत काही वाद असतील तर सामोपचाराने मिटविण्यात येतील आणि विकासाचे काम करण्यात येईल.

भाजपची १७ ला बैठक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे १७ मार्चला जळगावात येत आहेत. त्याच्या उपस्थितीत जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहतील. बाबा हरदासराम मंगल कार्यालयात ही बैठक होईल. 

खडसेंची राज्यसभेवर नियुक्ती  झाल्यास जिल्ह्यासाठी सन्मान
भाजपचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीच्या प्रश्‍नाबाबत उदय वाघ म्हणाले, हा मुद्दा वरिष्ठस्तरावर असतो, त्यामुळे त्याबाबत जिल्हाध्यक्ष म्हणूनही आपल्याला काहीही माहिती नाही, खडसे आमचे नेते आहेत. राज्यात त्यांचे काम चांगले आहे. पक्ष त्यांच्या कामाची योग्य दखल घेईलच. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती होत असेल, तर तो जिल्ह्यासाठी सन्मानच असेल.

Web Title: marathi news jalgaon news zp