राष्ट्रप्रेमाची "भरती' अन्‌ कर्तव्यनिष्ठेला "ओहोटी'! 

राष्ट्रप्रेमाची "भरती' अन्‌ कर्तव्यनिष्ठेला "ओहोटी'! 

गुरुवारी (14 फेब्रुवारी) पुलवामात झालेला दहशतवादी हल्ला भीषणच होता. या हल्ल्याच्या जखमा अनेक वर्षे प्रत्येक भारतीयांच्या मनावर भळभळत राहतील. या हल्ल्याबद्दल भारतीय म्हणून प्रत्येक देशवासीयाच्या मनातून संताप, तीव्र भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे, त्या भावनांचा आदर; परंतु प्रत्यक्ष अथवा सोशल मीडियातून व्यक्त होणाऱ्या या भावनांचा उद्रेक समाजाला बाधा पोहोचेल, या स्तराला जाऊ नये. अशा वेळी राष्ट्र म्हणून एकजूट दाखविताना राष्ट्रप्रेमाची "भरती' आल्याचे चित्र दिसत असले, तरी ती व्यक्त करताना कुठेही कर्तव्याला "ओहोटी' लागल्याचे दिसू नये... 

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात हल्ला हा आपल्या देशाविरुद्ध अनेक वर्षांपासून छेडलेल्या छुप्या युद्धातील एक भागच होता. याआधीही मुंबईवरील 26/11, लोकल गाड्यांना केलेले "टार्गेट' असे भीषण हल्ले भारताने मोठ्या धैर्याने पचविले. अलीकडचा उरी लष्करी तळावरील हल्ला आणि आता पुलवामा जिल्ह्यातील भीषण दहशतवादी हल्ल्याने सारा देश पेटून उठला आहे. काही वाचाळवीर नेते आणि स्वत:ला संरक्षणातील तज्ज्ञ मानणारे महाभाग वगळता सर्वच राजकीय पक्ष, संस्था व संघटनाही अशा वेळी अत्यंत प्रगल्भतेचे दर्शन घडवीत सावध प्रतिक्रिया देताना दिसताहेत. 

जळगाव जिल्ह्यासह खानदेशातही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. शनिवारी तर खानदेशात विविध शहरांमध्ये, अगदी ग्रामीण भागातही व्यावसायिकांनी हल्ल्याचा निषेध नोंदवत, शहीद जवानांप्रती अभिवादन करीत उत्स्फूर्तपणे बाजारपेठा बंद ठेवल्या. एरवी विविध संघटनांनी पुकारलेल्या "बंद'च्या वेळी व्यावसायिकांना आवाहन करावे लागते, प्रसंगी बळजबरीने दुकाने बंद करावी लागतात. शनिवारचे चित्र मात्र अत्यंत उत्स्फूर्त होते. प्रत्येक देशवासीयाच्या मनात या हल्ल्याविरुद्धचा प्रचंड संताप आणि जवानांप्रती कृतज्ञतेची भावना दिसून येत होती. राष्ट्रप्रेमाला "भरती' आलेले हे दृश्‍य खरोखरच अत्यंत भावस्पर्शी असेच होते. 

या हल्ल्याने देश हादरल्यानंतर व्यक्त होणारी ही सार्वत्रिक भावना होती. ती व्यक्त होणेही स्वाभाविक म्हटले पाहिजे; परंतु अशा प्रकारच्या भावना व्यक्त करताना एक सुज्ञ व सजग भारतीय म्हणूनही पाण कर्तव्ये बजावली पाहिजेत. पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध करण्याची गरज नाही. मात्र, या हल्ल्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याच म्हणजे भारतीयांचाच उपयोग करून घेतला. स्थानिकांच्या मदतीशिवाय असा मोठा हल्ला यशस्वी करणे शक्‍य नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांना भारतीय जवानांनी चोख उत्तर दिले पाहिजेच; परंतु सजग नागरिक म्हणून समाजात वावरताना काही देशविघातक घटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, काही संशयास्पद वाटल्यास त्याबद्दल सुरक्षा यंत्रणेस माहिती देणे क्रमप्राप्त ठरते. 

राष्ट्रभक्ती व्यक्त करण्यासाठी थेट सीमेवर जाऊन लढायची, शत्रूशी दोन हात करायची गरज नाही; तर आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाच्या हितासाठी, सुरक्षेसाठी काही केले तरी ते राष्ट्रप्रेमाचे उदाहरण ठरते. देशावरील संकटकाळात एकजूट होऊन, सरकार व पर्यायाने भारतीय जवानांच्या पाठीशी उभे राहण्यासोबतच आपण समाजासाठी काही करू शकतो का? याचा विचार करत सतर्क राहणे, ही कर्तव्याची बाजूही निभावली गेली पाहिजे; अन्यथा असे हल्ले झाल्यानंतर चार-आठ दिवसांच्या राष्ट्रप्रेमाच्या "भरती'नंतर त्यास कधी "ओहोटी' लागून आपण आपले स्वार्थी जीवन जगू, हे काही सांगता येत नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com