सावध पक्ष... अस्वस्थ उमेदवार 

सावध पक्ष... अस्वस्थ उमेदवार 


सर्वांच्या नजरा लागून असलेली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होणं ही औपचारिकता आज पूर्ण झालेली असली आणि पक्षांनी सज्जतेचा कितीही दावा केला असला तरी राजकीय पक्षांची सावध भूमिका आणि इच्छुक उमेदवारांची अस्वस्थता हे जळगाव जिल्ह्यातील वास्तव चित्र.. 
 
नरेंद्र मोदी विरोधात सर्व पक्ष अशा लढतीच्या "ऐलान-ए-जंग"ची आज निवडणूक आयोगाने रीतसर पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संथगतीने सुरू असलेल्या राजकीय पक्षांच्या तयारीला आता वेग येणार आहे. 
जळगाव जिल्ह्यातील राजकीय स्थितीचे चित्र बघता, सध्यातरी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडे जागा नसल्याने हे पक्ष "सपोर्टिव्ह" भूमिकेत आहेत. जागावाटप समीकरणात रावेर अन्‌ जळगाव या दोन्ही जागा भाजप, राष्ट्रवादीकडे असल्याने या दोन्ही पक्षांची सावध पावले आणि इच्छुकांमधील अस्वस्थता लपून राहिलेली नाही. 
दोन्ही मतदारसंघ खरे तर भाजपकडे आहेत. जळगावात भाजप उमेदवार बदलाच्या झोनमध्ये आहे. तर रावेर मतदारसंघात भाजप उमेदवार बदलाची "रिस्क' घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. ही स्थिती दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांसह इच्छुकांची अस्वस्थता वाढविणारी आहे. 
दुसरीकडे राष्ट्रवादीने जळगावसाठी गुलाबराव देवकरांचे नाव जाहीर करून आघाडी घेतली असली तरी रावेरबाबत राष्ट्रवादीत "सस्पेंस' कायम आहे. कॉंग्रेसने लावून धरलेला रावेरचा आग्रह आता सोडून दिल्यासारखा आहे. 
एकुणातच या दोन्ही जागा भाजप- राष्ट्रवादीच लढतील, हे स्पष्ट आहे, मुद्दा केवळ उमेदवार कोण? हाच उरतो. बऱ्याचदा प्रतिस्पर्धी उमेदवारावरही पक्षांची व्यूहरचना ठरत असते, त्यामुळे आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात उमेदवारांचे चेहरेही समोर येतीलच. निवडणूक रणधुमाळी रंगण्याची स्थिती असताना सावध पक्ष अन्‌ अस्वस्थ उमेदवार हे चित्र आता कधी आणि कसे बदलते ते पाहावे लागेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com