वाघांच्या उमेदवारीचा "उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून! 

वाघांच्या उमेदवारीचा "उदय' परिषदेच्या तिसऱ्या गटातून! 

जळगाव जिल्हा भाजपमधील खडसे-महाजन गटात दोन वर्षांपूर्वी पालकत्व स्वीकारणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या तिसऱ्या गटाची भर पडली. या तिन्ही गटांतील समन्वय-असमन्वय या दोन वर्षांत जिल्हावासीयांनी अनुभवलाही. आता लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील उमेदवारीच्या निमित्ताने या तीन गटांमधील स्पर्धा समोर आलीच. खडसेंना स्नुषाची उमेदवारी राखण्यात वजन वापरावे लागले. महाजनांना जळगावात आपल्या मर्जीतील उमेदवार देता आला नाही. अशात आमदार स्मिता वाघ यांची जाहीर झालेली उमेदवारी तिसऱ्या अर्थात चंद्रकांतदादांच्या व पर्यायाने "अभाविप'च्या गटातून "उदया'स आली असेल तर ते अपेक्षितच आहे. 

जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे व मंत्री गिरीश महाजन यांच्यातील सख्य उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या अडीच वर्षांत या गटांतील दरी अधिक वाढली. या दोघा भाऊंमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्ह्याचे पालक म्हणून आलेल्या दादांचा (चंद्रकांत पाटील) तिसरा गट जळगाव जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आला. खडसे-महाजन समर्थकांशिवाय भाजपत जी संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित मंडळी होती, ती चंद्रकांतदादांच्या गटाकडे आपसूकच वळली. अगदी दादांच्या दौऱ्यापासून तर कार्यक्रमांचे नियोजनही परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे आले. त्यामुळे दादांचाही जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात "से' निर्माण झाला. 
कोणत्याही निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रत्येक राजकीय "से'ला आपोआपच महत्त्व प्राप्त होते. जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर व जळगाव मतदारसंघातील उमेदवारीचा "दोलक' सहा महिन्यांपासूनच हलू लागला होता. त्यातून दोघा खासदारांच्या कामगिरीबाबतचे सर्वेक्षण, त्याचा अहवाल, खडसेंवरील पक्षाची नाराजी, कुटुंबातील उमेदवारी असे अनेक विषय चर्चेत समोर आले. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांचा भुसावळ दौरा झाला आणि रक्षा खडसेंच्या उमेदवारीला या जंक्‍शन स्थानकाच्या ठिकाणीच "ग्रीन सिग्नल' मिळाला. मात्र, खासदार ए. टी. पाटलांची उमेदवारी कापली जाणार, हे भाकीत अनेक हेलकावे खाऊन काल-परवा खरे ठरलेच! उमेदवारी नाकारण्यामागे अप्रत्यक्षपणे कथित व्हायरल "क्‍लिप'चा संदर्भ आहे, पण त्याबद्दल कुणी उघडपणे बोललेले नाही. मुळात, ही क्‍लिप व्हायरल झाली तीच केवळ दिल्लीचे तिकीट कापण्यासाठी, हे आता उघड झालेय. 
स्वाभाविकतः जळगावातून भाजपचा उमेदवार म्हणून अनेक पर्यायांवरही चर्चा झाली. पाटबंधारे खात्याचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटलांपासून उन्मेष पाटलांपर्यंतच्या या चर्चेत स्मिता वाघ, डॉ. सुरेश सूर्यवंशी, उद्धवराव माळी, डॉ. संजीव पाटील. अगदी करण पवारांचेही नाव समोर आले. वेगवेगळ्या नावांसाठी वेगवेगळ्या शक्तींनी जोर लावला. राज्याच्या राजकारणात "से' निर्माण झालेल्या महाजनांनीही एक नाव लावून धरले, तेदेखील मागे पडले. आणि अखेर स्मिता वाघांच्या नावावर पक्षनेतृत्वाने शिक्कामोर्तब केले. 
आता स्मिता वाघांना उमेदवारी कशी मिळाली, हा विषय चघळला जात आहे. एकतर वाघ दाम्पत्य विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते, चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व. संघटनेत विविध पदांवर यशस्वीपणे काम केलेले, पुढे जाऊन भाजपशी जोडले गेले. भाजपत विद्यार्थी परिषदेचा वरचष्मा असलेले एक केडर आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह विनोद तावडे, चंद्रकांतदादा, केंद्रात नितीन गडकरी स्वतः पक्षाध्यक्ष अमित शहा हे परिषदेतून विकसित झालेले नेतृत्व. त्यामुळे स्मिता वाघांच्या नावासाठी महाजन-खडसेंव्यतिरिक्त असलेला परिषदेचा तिसरा गट सक्रिय होणे स्वाभाविक होते, आणि परिषदेच्या याच गटाने म्हणा की, वाघ दाम्पत्याच्या परिषद केडरने. त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात यश मिळविले. या उमेदवारीच्या निमित्ताने का होईना, परिषदेचा गट खडसे-महाजनांवर "हावी' ठरला, असे मानले जाणे स्वाभाविक म्हणावे लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com