विकासकामे...बहुजनदुखाय अन्‌ मक्तेदारहिताय! 

विकासकामे...बहुजनदुखाय अन्‌ मक्तेदारहिताय! 

रस्त्यातील खड्डे, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेला चिखल, स्वच्छतेचा बोजवारा, तुडुंब भरलेल्या गटार, अतिक्रमणाचा विळखा... जळगावसह अन्य शहरांची ही सार्वत्रिक समस्या. जळगाव तर अशाप्रकारच्या समस्यांचे आगार झालेय.. याचा अर्थ, जळगावात काही विकासकामेच होत नाही, असाही नाही. "अमृत'ची जलवाहिनी, रस्त्यांमधील दुभाजक, एलईडी पथदिवे, स्वच्छतेसाठीचा एकमुस्त ठेका.. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण, ही कामे बहुजनदुखाय अन्‌ "मक्तेदारहिताय' आहेत का, अशी शंका येण्यास बऱ्यापैकी वाव... 

विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महामार्गांसह विविध शहरांमधील खड्डे प्रचाराचा मोठा मुद्दे बनले होते. त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपने विविध प्रश्‍नांना "हवा' दिली होती, तरी रस्त्यांचा मुद्दा कळीचा बनवून "कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..' या "टॅगलाइन'खाली अत्यंत आक्रमक कॅम्पेन चालविले. मोदी फॅक्‍टर आणि हे प्रभावी कॅम्पेन काम करून गेले आणि भाजपने राज्यातील तख्त काबीज केला. 
...आता पाच वर्षे झालीत. आजच्या स्थितीत भाजपने पाच वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रात खूप मोठा बदल घडवून कायापालट केला, अशी स्थिती नाही. "कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा..' ही टॅगलाइन पुन्हा एकदा वापरली जाणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते. जळगाव शहराची स्थितीही फारशी वेगळी नाही. या शहरात गेल्या वर्षी महापालिकाही भाजपने ताब्यात घेतली आहे. मात्र, पाच वर्षांपूर्वी काय, वर्षभरआधी काय किंवा आज.. शहराच्या स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. 
हा! सुधारणेची सुरवात झालीय, असे म्हणता येईल. कारण, दोन वर्षांपूर्वी "अमृत'अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. त्यासाठी आधीच खड्ड्यांत गेलेले रस्ते खोदून समस्या अधिक बिकट झाली. आता शासनाने त्यात अशी खुटी घातली की, हे काम आणि भुयारी गटारांचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे हाती घेऊ नयेत.. झालं, खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांना पुन्हा सपाटीकरणाची प्रतीक्षा. "अमृत'चे कामही कासवगतीने होत असल्याने नागरिकांच्या जिवाचा संताप होत असताना शहरातील प्रमुख व अन्य मार्गांवरील बंद पथदिव्यांनी "आंधळी कोशिंबीर'चा खेळ सुरू आहे. त्यासाठी एलईडी दिव्यांचा मक्ता दिला गेला, पण अर्ध्या शहरातही हे काम न करता मक्तेदार भुर्रर्र... आता या मक्‍त्यावर झालेल्या खर्चाची जबाबदारी कुणाची? हा प्रश्‍नच आहे. 
पथदिवे, रस्त्यांची ही अवस्था असताना स्वच्छतेचा बोजवाराही शहरातील प्रमुख समस्या. 75 कोटींचा एकमुस्त ठेका सुरू झाला आहे, पण त्याचे नियोजन अद्यापही विस्कळित. काही भागात कचरा संकलित करणारी वाहने नियमित फिरताहेत, पण काही भागात मात्र त्या पोचलेल्या नाहीत. शिवाय, शहरातील प्रमुख उकिरडे उचलण्याच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. काही रस्त्यांवर दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे दुभाजक नेमके वाहतुकीच्या योग्य नियनमासाठी टाकले जात आहेत की, केवळ कुणालातरी काम द्यायचे आणि खूष करायचे, यासाठी? कोर्टचौक ते गणेश कॉलनीपर्यंतचे दुभाजक हे रस्त्याची गरज नसताना केलेल्या कामाचे उत्तम उदाहरण म्हणून शैक्षणिक पुस्तकात देता येईल. 
या एकूणच स्थितीत जळगाव महापालिकेला शहरातील विकास नेमका कोणत्या दिशेने न्यायचा आहे, हेच कळेनासे झालेय. रस्त्यांमधील खड्ड्यांनी आमदारांचाही पिच्छा सोडला नाही, तिथे सामान्य नागरिकाची काय दशा? आमदारांवरील ही आपत्ती किमान रस्त्यांचे भाग्य उजळणारी इष्टापत्ती ठरावी, हीच प्रभुचरणी प्रार्थना.. ! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com