राज्यात दररोज कॅन्सरचे साडेपाच हजार नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

जळगाव ः तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेकांचे बळी जात आहेत. राज्याचा विचार केल्यास दररोज साधारण साडेपाच हजार नवीन रुग्ण निर्माण होत असल्याची बाब एका सर्व्हेनुसार समोर आली आहे. 

जळगाव ः तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेकांचे बळी जात आहेत. राज्याचा विचार केल्यास दररोज साधारण साडेपाच हजार नवीन रुग्ण निर्माण होत असल्याची बाब एका सर्व्हेनुसार समोर आली आहे. 

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अति सेवनामुळे अंमली पदार्थांवर बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. देशातील 17 राज्य आणि दोन केंद्र शासीत भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. तरी देखील सर्रासपणे विक्री सुरू आहे. 
तंबाखू- तंबाखूजन्य पदार्थ आणि वाढते प्रमाणात स्मोकरची जीवनयात्रा संपविण्यास कारणीभूत ठरत असताना देखील सेवनाचे प्रमाण कमी होत नसून वाढतच आहे. यात कॅन्सरचे प्रमाण अधिक वाढत आहे. या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे साधारण 40 टक्‍के व्यक्‍तींना कॅन्सरचा आजार होत आहे. यामध्ये पुरूषांचे प्रमाण हे 70 टक्‍के आहे. प्रामुख्याने तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होत आहे. 

राज्यात रोज 2800 मृत्यू 
ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्व्हे (गॅट्‌स) तर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेच्या अहवालानुसार देशातील एक तृतीयांश लोकसंख्या ही तंबाखूच्या आहारी गेली असून त्यात तरुणांची संख्या अधिक आहे. देशात एकूण तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील जनतेचे प्रमाण अधिक आहे. यामुळे "गॅटस्‌'च्या अहवालानुसार राज्याचा विचार केल्यास 31.4 टक्‍के जनता ही तंबाखू सेवन करत आहे. या सेवनामुळे होणाऱ्या आजारातून मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही रोजची 2 हजार 800 इतकी आहे. तर 10 लाख व्यक्‍ती या स्मोकिंगच्या आहारी जात आहे. 

महिलांचे प्रमाणही वाढतेच 
अमेरिकन मेडिकल असोसिएशनने जगातील धूम्रपानाचे परिणाम आणि एकूणच ओढली जाणारी सिगारेट यांचे सर्वेक्षण केले; या सर्वेक्षणात एकूण 178 देशांमधून भारतात धूम्रपान करणाऱ्या महिला ह्या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. गर्भधारणा कालावधीत सिगारेट किंवा विडी पिणाऱ्या महिलांना कमी वजनाची मुले जन्मास येतात. अशा मुलांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते किंवा ते कोणत्याही आजारास लगेच बळी पडतात. शिवाय, मोठ्या शहरात, मॉलमध्ये सर्रासपणे स्मोकिंग किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या महिला दिसून येत असतात. 

"ई- सिगारेट'चे आकर्षण 
सिगारेट किंवा बिडी पिणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारातील सिगारेट मार्केटमध्ये असताना काही ठिकाणी उघड्यावर धूम्रपान करण्यास बंदी आहे. यामुळे स्मोकिंग करणाऱ्यांसाठी "इलेक्‍ट्रॉनिक सिगारेट' हा एक नवीन प्रकार सध्या मार्केटमध्ये आहे. राज्यातच नव्हे तर जळगावात देखील याचा वापर होत आहे. "इलेक्‍ट्रॉनिक सिगारेट' म्हणजे पेनाप्रमाणे खिशाला लावता येते. त्याचे बटन दाबून त्याद्वारे स्मोकिंग केली जाते. हे झाल्यानंतर ते बंद करून पुन्हा ते खिशात ठेवता येते. 

"तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ते आकर्षणामुळे सेवन केले जात आहे. यामुळे आजार उद्‌भवत असून, हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्‍यक आहे. मुळात 55 टक्‍के पुरुष याचे सेवन करत असून, स्मोकिंग करण्यात महिलांचे प्रमाण देखील वाढत आहे. यात आता ई सिगारेटचा वापर केला जात आहे.' 
-डॉ. गोविंद मंत्री, प्रचारक तंबाखू मुक्त अभियान. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon no smoking canser new pasinet