नोटा बदलवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

रावेर : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देणाऱ्या गुजरातमधील टोळीस इंदूरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी आज पकडले. या टोळीत रावेर, भुसावळच्या संशयितांचा समावेश आहे. दरम्यान, या टोळीतील एकाचे रावेरजवळून अपहरण झाल्याची तक्रार रावेर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अशा प्रकारचे व्यवहार करणारी मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

रावेर : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देणाऱ्या गुजरातमधील टोळीस इंदूरमध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी आज पकडले. या टोळीत रावेर, भुसावळच्या संशयितांचा समावेश आहे. दरम्यान, या टोळीतील एकाचे रावेरजवळून अपहरण झाल्याची तक्रार रावेर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अशा प्रकारचे व्यवहार करणारी मोठी टोळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
साजिद शेख, सय्यद शोएब हे दोघेही सुरत येथील असून कादर आणि अख्तर हे आणखी दोघे त्यांचे तेथील साथीदार भुसावळ येथील इम्रान (पूर्णनाव माहीत नाही) आणि रावेर येथील हबीब बाबा, बोदवड येथील कलीम यांच्या संपर्कात होते. सुरत येथील या चौघांचा जुन्या नोटा घेऊन नव्या नोटा बदलून देण्याचा धंदा होता. 
11 ऑगस्टला रात्री उशिरा सुरतचे सर्वजण बऱ्हाणपूरकडून एका बोलेरो आणि निळ्या रंगाच्या गाडीत आले आणि शहराबाहेर त्यांना भेटण्यासाठी इम्रान आणि हबीब बाबा गेले. त्यावेळी शोएबला इम्रान, हबीब आदींनी पैशांसह अपहरण केल्याची तक्रार साजिद शेखने रावेर पोलिस ठाण्यात केली. 
रावेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी जाकीर पिंजारी, भरत सुपे, गोराळकर आदींनी बऱ्हाणपूर पोलिसांना संशयित आणि गाडीचे वर्णन कळविले होते. दरम्यान, आज इंदूरमध्ये हबीब, इम्रान आदींना भंवरकुआजवळ मध्य प्रदेशच्या एटीएस पथकाने एक कोटी पाच लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह ताब्यात घेतले आहे. 
गुजरातमधील हे चौघे केव्हापासून हा व्यवसाय करीत आहेत?, या रॅकेटमध्ये रावेर, भुसावळच्या दोघांचा सहभाग का आहे? अपहरणाची घटना खरी आहे की नाटक? जुन्या नोटा घेऊन नव्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय खरा असेल तर ते जुन्या नोटा कशा बॅंकेत भरणा करतात? यात आणखी कोणी बडी आसामी सहभागी आहे का?, फिर्यादी साजिद जर जुन्या नोटा देवाणघेवाण व्यवहारात सामील होता, तर रावेर पोलिस त्याच्यावर काय कारवाई करणार? या इतक्‍या मोठ्या रकमेच्या जुन्या नोटा कुठून आल्या? जुन्या एक कोटी रुपयांच्या बदल्यात नव्या पंचवीस लाखांच्या नोटा खरच हे संशयित देत होते का? असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले असून पोलिसांनी कसून तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news jalgaon not badli gang arrest