महामार्ग चौपदरीकरणास पूर्णविराम नाहीच! 

सचिन जोशी
सोमवार, 31 डिसेंबर 2018

गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरणाचे कवित्व सुरू आहे, ते अद्यापही संपलेले नाही. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील महामार्गांच्या चौपदरीकरणास चालना मिळाली असली तरी ते पूर्ण होणे अपेक्षित असताना सरत्या वर्षात या कामांना पूर्णविराम मिळू शकला नाही. जिल्ह्यातील काही टप्प्यात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी ठप्प आहे. जळगाव शहरातील बहुप्रतीक्षित समांतर रस्त्यांसाठीही नववर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 

गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरणाचे कवित्व सुरू आहे, ते अद्यापही संपलेले नाही. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील महामार्गांच्या चौपदरीकरणास चालना मिळाली असली तरी ते पूर्ण होणे अपेक्षित असताना सरत्या वर्षात या कामांना पूर्णविराम मिळू शकला नाही. जिल्ह्यातील काही टप्प्यात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी ठप्प आहे. जळगाव शहरातील बहुप्रतीक्षित समांतर रस्त्यांसाठीही नववर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
 
जिल्हा, राज्य अथवा राष्ट्राच्या विकासात रस्त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते हा घटक म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण व विकासाला चालना देणारा आहे. जळगाव जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, जळगाव- औरंगाबाद राज्य महामार्ग, जळगाव-पाचोरा- चांदवड आणि अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर या चार प्रमुख मार्गांच्या चौपदरीकरणासह रुंदीकरणाच्या कामांची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. 

राष्ट्रीय महामार्गाची स्थिती 
राष्ट्रीय महामार्गाच्या फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली या दोन टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. तरसोद- चिखली कामास गती आहे, परंतु ती अपेक्षित तेवढी नाही. तर फागणे- तरसोद काम गेल्यावर्षी जोमात सुरू झाले, मात्र सहा महिन्यांपासून ते निधीअभावी ठप्प आहे. संबंधित मक्तेदार एजन्सीची निधीच अडचण सरकार अद्याप दूर करू शकलेले नाही. 

जळगाव- औरंगाबाद मार्ग संथगतीने 
औरंगाबाद- जळगाव हा खरेतर अजिंठ्यासारख्या जगविख्यात पर्यटनस्थळावरुन जाणारा महत्त्वाचा मार्ग. त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली ती औरंगाबाद- अजिंठ्यापर्यंतच. नंतर प्रयत्नपूर्वक जळगावपर्यंत हे काम मंजूर करण्यात आले आणि सुरूही झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांत या कामातही संथगती दिसून येत आहे. याठिकाणीही मक्तेदार एजन्सीला निधीच अडचण असल्याचे सांगितले जात आहे. 

अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूरची प्रतीक्षा कायम 
मध्यप्रदेश- महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा अंकलेश्‍वर- बऱ्हाणपूर रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या कामाची घोषणाही तीन वर्षांपूर्वी केली. मात्र, ते मार्गी लागण्याच्या दृष्टीने पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. आता या राज्य महामार्गाच्या जळगाव- धुळे जिल्ह्यातील कामासंदर्भात सर्वेक्षण करून "डीपीआर' तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. तर दुसरीकडे जळगाव- पाचोरा- व पुढे चांदवडपर्यंतच्या रस्तेकामाला गेल्या वर्षभरात बऱ्यापैकी चालना मिळाली. 
 
कामे पूर्ण करणे ठरणार आव्हान 
एकंदरीत गतवर्षात जिल्ह्यातील विविध रस्तेकामांच्या संदर्भात कार्यवाही झाली खरी, मात्र प्रत्यक्ष कुठेही काम पूर्णत्वास येत आहे, असे दिसून आले नाही. केवळ विविध रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी आवश्‍यक सपाटीकरण, वृक्षतोड व त्यासंबंधी कामे झाल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात रस्त्यांच्या बांधकामास कुठेही सुरवात झालेली नाही. जळगावकर नागरिकांनी सातत्यने विषय लावून धरला, आंदोलन केले म्हणून शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांच्या कामाला चालना मिळाली. वर्षाच्या शेवटी का होईना, शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची निविदा ऑनलाइन प्रसिद्ध झाली. मात्र, निविदा येऊन, ती मंजूर होऊन, कार्यादेश व काम सुरू होणे हे मोठे आव्हान येणाऱ्या वर्षात ठरणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon notilan highway 4 way