साहिबा...गलती झाली, माफी दे...!

साहिबा...गलती झाली, माफी दे...!

जळगाव  : शहरात पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने कायमच महिलांची कुचंबणा होत असते. त्यातच काही स्वच्छतागृहे अन शौचालये पाडल्यामुळे अनेकींना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असा प्रसंग एका वृद्ध महिलेवर ओढवला आणि तिला थेट पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागली. भजेगल्लीत महिला डॉक्‍टरने आपल्या कारच्या आडोशाला लघुशंका करणाऱ्या या वृद्धेला पोलिस ठाण्यात ओढून आणले. एवढेच नाही तर लेखी तक्रार करून तिच्यावर कारवाईसाठी तगादा लावला... 

जळगाव शहरात खड्डेमुक्त रस्ते नाही, गटारी नाही, कचराकुंड्यांची अवस्था बिकट, मूलभूत नागरी सेवासुविधांची बोंब असताना स्वच्छतागृहे, शौचायलये तोडण्याचा धडाका महापालिकेने लावला आहे. अशा समस्यांनी घेरलेल्या शहरात भालोद येथील 65 वर्षीय वृद्ध महिला बाजाराला आली होती. दरम्यान, ही वयोवृद्ध महिला लघुशंकेसाठी जागाच सापडत नव्हती. अखेर असह्य झाल्याने भजेगल्लीतील एक कारच्या आडोशाला ही आजीबाई बसली. तेवढ्यात वरच्या मजल्यावर असलेल्या डॉक्‍टर महिलेने आपल्या कारच्या आडोशाला लघुशंकेला बसल्याचा जाब विचारत वृद्ध महिलेला चांगलेच खडसावले. एवढ्यावरच न थांबता तिला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणून आताच गुन्हा दाखल करा, यासाठी हट्ट धरला. घडल्या प्रकाराने ठाणे अंमलदारही भेदरला. सुरवातीला समजूत घालण्याचा प्रयत्न या डॉक्‍टर महिलेस केला. मात्र, त्या ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे निरीक्षक अकबर पटेल यांच्या येण्याची वाट पाहावी लागली. अखेर डॉक्‍टर महिलेने लेखी तक्रार दिली. 

कायदा कागदावरच...! 
पेट्रोलपंप, दवाखाने, हॉटेल्स्‌, लॉज आणि कुठलेही व्यापारी संस्थान असो, ते महिलांना लघुशंकेसाठी उपलब्ध करून द्यावेत, असा महापालिकेचा कायदाच अस्तित्वात आहे. मात्र, असे असतानाही वृद्ध महिलेची कुंचबणा झाली. त्यातूनच तिला अपमान सहन करावा लागला, ही निश्‍चितच लाजीरवाणी बाब आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com