एक तपानंतरही अडीच लाख ठेवीदार ठेवीपासून वंचित 

एक तपानंतरही अडीच लाख ठेवीदार ठेवीपासून वंचित 

जळगाव ः जिल्ह्यात 2004-2005 च्या सुमारास पतसंस्थांचे भरघोस पीक आले होते. या काळात शंभरापेक्षा अधिक पतसंस्था उदयास आल्या. मात्र, अवघ्या दोन वर्षांत 2007 पासून पतसंस्था डबघाईस आल्या. त्यामुळे तब्बल सहा लाख ठेवीदारांना हक्काच्या ठेवींपासून वंचित राहावे लागले होते. मात्र, शासनाने केलेल्या मदतीमुळे साडेतीन लाख ठेवीदारांना ठेवींच्या थोडकी रक्कम परत करण्यात आली. आजही दोन लाख तेहेतीस हजार ठेवीदारांच्या 528 कोटींच्या ठेवी पतसंस्थांमध्ये अडकून पडल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक विभागाने जर थोडे जरी लक्ष दिले तरी ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळू शकतील. गरज आहे ती अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. 
जिल्ह्यात 2004-2005 पर्यंत सहकार चळवळ जोमात होती. 2000 ते 2005 या कालावधीत पतसंस्थांची संख्या झपाट्याने वाढली. कारण ठेवीदारांना पतसंस्था चालक राष्ट्रीयीकृत बॅंकांपेक्षा अधिक व्याजदर देत होते. यामुळे शासकीय व खासगी नोकरदारांनी सेवानिवृत्तीची रक्कम, मिळालेल्या पी.एफ.ची रक्कम पतसंस्थांमध्ये ठेव म्हणून ठेवली. सर्वाधिक ठेवीदारांची संख्या रेल्वे, ऑर्डनन्स फॅक्‍टरी, खडका सूतगिरणी, शेतकरी यांची होती. सलग दोन-तीन वर्षे ठेवीदारांनी चांगला व्याजदर मिळाला खरा. मात्र 2007 पासून पतसंस्था डबघाईस येण्यास सुरवात झाली. पतसंस्थाचालकांनी ठेवीदारांच्या पैशांवर मोठा डल्ला मारला. इतर पतसंस्था डबघाईचा फायदा घेत आपलीही संस्था डबघाईस दाखवत पतसंस्थांची कार्यालयेच बंद केली. 
ठेवीदारांच्या पैशांवर पतसंस्थाचालकांनी स्वतःच्या मालमत्ता वाढविल्या. केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे; तर राज्यभरात विविध ठिकाणी मालमत्ता घेतल्या. ठेवीदार जेव्हा ठेवींच्या रकमा परत घेण्यास गेले तेव्हा पतसंस्था बंद, संस्थाचालकही फरार झाले. अनेक पतसंस्था चालकांवर गुन्हे दाखल झाले. काहींना अटक झाली. काहींनी स्वतः अटक करवून घेतली. बाहेरही आले आता ठेवीदारांना दोष देत आम्हाला मध्ये पाठविले, आता ठेवीच्या रकमा कशा परत करू? असा उलटा प्रश्‍न ठेवीदारांना करीत रिकाम्या हाती परत पाठविले जात आहे. 

शंभरापेक्षा अधिक ठेवीदार मृत 
अनेक ठेवीदारांना ठेवीच्या रकमा वेळेवर मिळाल्या नसल्याने शंभरापेक्षा अधिक ठेवीदारांचे मृत्यू झाले. काहींना आपल्या उपवर मुला-मुलींचे विवाह करून देता आले नाही, तर काहींना मुलांना उच्चशिक्षण देता आले नाही. 

पतसंस्थाचालक तुपाशी अन्‌..
जिल्हा सहकार विभागाने पतसंस्थांवर प्रशासक बसवून कर्जदारांकडून कर्जवसुलीची प्रक्रिया राबविली. मात्र, त्यात शंभर टक्के यश आले नाही. 2007-2008 मध्ये सुमारे सहा लाख ठेवीदारांच्या 999 कोटी 64 लाखांच्या ठेवी त्यावेळी अडकल्या होत्या. आतापर्यंत तीन लाख 63 हजार ठेवीदारांना 502 कोटींच्या ठेवी परत केल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक विभाग करते. तर दोन लाख 33 हजार ठेवीदारांना 528 कोटी नऊ लाखांच्या ठेवी अद्याप परत करणे बाकी आहेत. एक लाख 73 हजार कर्जदारांकडे एक हजार 54 कोटींची बाकी होती. जिल्हा उपनिबंधक विभागाने एक लाख 48 हजार कर्जदारांकडून 525 कोटी वसूल केले. आता 25 हजार कर्जदारांकडे 525 कोटी बाकी आहेत. ठेवीदारांनी कष्टाने कमावलेला पैसा पतसंस्थाचालकांनी स्वतःच्या मालमत्ता वाढविण्यासाठी वापरून ठेवीदारांना देशोधडीला लावले आहे. जिल्हा उपनिबंधक विभागाने कर्जदाराकडून वसुलीची मोहीम तीव्रतेने राबविली तरच ठेवीदारांच्या रकमा परत मिळतील. मात्र त्याकडे ना अधिकारी लक्ष देत ना सहकार राज्यमंत्री, हेही तितकेच खरे. 

आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक विभागाने तीन लाख 63 हजार ठेवीदारांचे 502 कोटी परत केले. दोन लाख 33 हजार ठेवीदारांचे 528 कोटी रुपये येणे आहेत. ते परत करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. लवकरच ठेवीदारांच्या ठेवी परत करू. 
- मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक 

सहकार विभाग नेहमीच पतसंस्था चालकांना बाजू घेत आला आहे. यामुळे वेळेवर ठेवीदारांना ठेवीच्या रक्कमा परत न मिळाल्याने 100 वर ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे. ठेवींच्या रक्कमा परत मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन करीत आहोत. 
प्रविणसिंग पाटील, अध्यक्ष खानदेश ठेवीदार संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com