एकाच "निर्भया' पथकावर मुलींच्या सुरक्षेचा भार 

एकाच "निर्भया' पथकावर मुलींच्या सुरक्षेचा भार 

जळगाव ः महाविद्यालय आवारात टवाळखोरांकडून उच्छाद मांडला जातो. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या तरुणींची त्यांच्याकडून छेडछाडीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे शहरात निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. परंतु संपूर्ण जिल्ह्यात केवळ शहरातच हे पथक कार्यरत असून, संपूर्ण शहरात या पथकाला गस्त घालावी लागत असल्याचे समोर आले आहे. 
गेल्या काही वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेसाठी तसेच महाविद्यालयाबाहेर उभ्या राहणाऱ्या रोडरोमिओंवर व टवाळखोरांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. आजतागायत हे पथक शहरात कार्यरत असून, सकाळपासून हे पथक महाविद्यालये, गर्दीच्या ठिकाणांसह रोडरोमिओंच्या मागावर असते. संपूर्ण जिल्ह्यासह शहरात केवळ एकच निर्भया पथक आहे. शहरात अनेक महाविद्यालये आहेत यामध्ये हे पथक गस्तीसाठी गेले असता पथकाला बघूनच टवाळखोर त्या ठिकाणाहून धूम ठोकतात. परंतु, काही वेळानंतर पथक त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा ते टवाळखोर उच्छाद करीत असल्याने संपूर्ण शहराची जबाबदारी केवळ एकच पथकावर येत असल्याचे समोर आले आहे. 

"निर्भया'ची जबाबदारी चारच कर्मचाऱ्यांवर 
निर्भया पथकात केवळ चार पोलिस असून, यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे चार कर्मचारी दिवसभर शाळा, महाविद्यालये, मेहरुण परिसर यासह कॉलेजकट्ट्यांच्या ठिकाणी गस्त घालतात. टवाळखोरांसह विद्यार्थिनींच्या छेडखानीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी या पथकात आणखी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याची आवश्‍यकता आहे. 

वर्षभरात 80 जणांवर कारवाई 
शहरात गस्त घालताना रोडरोमिओंना हटकताना काही प्रेमीयुगुलांनाही या पथकाकडून ताब्यत घेतले जाते. महाविद्यालयांसह मेहरुण परिसरात फिरणाऱ्या प्रेमीयुगुलांना या पथकाने ताब्यात घेत पोलिस ठाण्यात हजर केले. वर्षभरात सुमारे 80 प्रेमीयुगुलांवर कारवाई करून त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. 

"लेडी सिंघम'चा वचक 
जामनेर पोलिस ठाण्यात "लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजू तिवारी यांची गेल्या दोन महिन्यांपूर्वीच जळगावात बदली झाली आहे. पोलिस दलाकडून त्यांच्यावर निर्भया पथकाची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. दोन महिन्यांत महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणाऱ्या 25 जणांवर त्यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे "लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती तिवारी यांचा टवाळखोरांवर चांगला वचक निर्माण झाला आहे. 

महाविद्यालयांच्या आवारात फिरणाऱ्या प्रेमीयुगुलांसह टवाळखोरांवर निर्भया पथकाकडून ताब्यात घेतले जाते; परंतु त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून समजपत्र लिहून घेतो. तसेच त्यांच्या पालकांना संबंधित पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केले जाते. 
- मंजू तिवारी, हवालदार, निर्भया पथक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com