ओपिनियन मेकर - परिवर्तनाच्या दृष्टीने पाऊल टाकल्यास होईल विकास : डॉ. अनिल लोहार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

जळगाव शहराच्या अनेक वर्षांपासून समस्या कायम आहेत.

जळगाव शहराच्या अनेक वर्षांपासून समस्या कायम आहेत. महापालिकेत निवडून येणारे नगरसेवक तेच आहे. सोबतच त्यांच्या पाठीशी असलेले नेते देखील तेच आहेत. यात शहरात प्राथमिक सुविधा तर नाहीच परंतू इतरही नवीन काही सुविधा केल्या जात नाही. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जो पर्यंत शहरात परिवर्तनाच्या दुष्टीने काही पावले उचलली जाणार नाही तोपर्यंत शहराचा विकास होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी परिवर्तनाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

जळगाव शहराच्या समस्या आज काही नवीन नाहीत. अनेक वर्षांपासून त्याच त्या समस्या आपल्या समोर आहे. दिवसेंदिवस त्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिकांना जास्त काही महापालिकेकडून नको आहे. नागरीकांना फक्त चांगले रस्ते, शुद्ध पुरेसे पाणी, भुयारी गटार, स्वच्छता, पथदिवे, उद्याने, दर्जेदार शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यातही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिका प्रशासन अपुरे पडत असेल, तर यात कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे. शहरात सध्या जे काही प्रश्‍न आहेत, ते या मूलभूत नागरी सुविधांशी संबंधितच आहेत.

शहरातील अनेक भागात रस्ते, गटारी नाहीत. नियमितपणे स्वच्छता देखील होत नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता होते त्याठिकाणी देखील कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी योग्य अशी जागा नाही. सभोवतालच्या वाढीव वस्त्यांची अवस्था बिकट आहे. महापालिका आवश्‍यक अशा सर्व गोष्टींचा कर नागरीकांकडून जमा करत असते मात्र असे असताना देखील आवश्‍यक तशा सुविधा नागरीकांना पुरविल्या जात नाहीत. गेल्या पंधरा- वीस वर्षांपासून हीच स्थिती असून, ती बदलायला तयार नाहीत. या समस्यांकडे लक्ष द्यायला नगरसेवकांना देखील वेळ नसल्याने दिवसेंदिवस समस्या अजूनच वाढत आहे. किमान या सुविधांवर लक्ष केंद्रित केले तर शहराचे नियोजन योग्य प्रकारे होऊ शकेल. येत्या काळात नागरी सुविधांना प्राधान्य देणे हे उमेदवारांचे अत्यंत महत्त्वाचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे.

गेल्या काही वर्षांत जळगावातील उद्योगही बंद पडले तर काही उद्योग स्थलांतरित झाले. मात्र नवीन उद्योग सुरु झाले नाही. या प्रकारांनी देखील पालिकेचे प्रतिकूल धोरण कारणीभूत आहे. आज तंत्रज्ञान इतकी प्रगती करत असता महापालिका मात्र अजूनही पारंपारिक शिक्षणाच्या मागे धावत आहे. अजूनही शिक्षणामध्ये डिजिटाझेशन झालेले नाही. याचा एकूणच परिणाम शहराच्या विकासावर होत असल्याचे दिसून येत आहे. नागरी सुविधांबरोबरच महापालिकेला शिक्षणाच्या विकासाचाही विचार करावाच लागणार असून त्यासाठी परिवर्तन होणे आवश्‍यक आहे.

 

Web Title: marathi news jalgaon opinian mader anil lohar