ओपिनियन मेकर- नागरी सुविधांसोबतच मुलांना मैदानंही हवीत : मनोज गोविंदवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

रस्ते, गटार, पथदिवे, स्वच्छता, पाणीपुरवठा या नागरी सुविधांवर बरीच चर्चा होते. विकासावर बोलताना हे घटक प्राधान्याने समोर येतात. मात्र, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मैदानांवर आज कुणी बोलायला तयार नाहीत. शहरातील खुल्या जागांवर बांधकामे होऊन गेलीत, त्यामुळे मैदानेच नाहीत. मुलांची शारीरिक व एकूणच जडणघडण मैदानांवरच होत असते. त्यामुळे नागरी सुविधा ही जशी "प्रायॉरिटी' आहे, त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी मैदानंही हवीत. 
 

रस्ते, गटार, पथदिवे, स्वच्छता, पाणीपुरवठा या नागरी सुविधांवर बरीच चर्चा होते. विकासावर बोलताना हे घटक प्राधान्याने समोर येतात. मात्र, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मैदानांवर आज कुणी बोलायला तयार नाहीत. शहरातील खुल्या जागांवर बांधकामे होऊन गेलीत, त्यामुळे मैदानेच नाहीत. मुलांची शारीरिक व एकूणच जडणघडण मैदानांवरच होत असते. त्यामुळे नागरी सुविधा ही जशी "प्रायॉरिटी' आहे, त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी मैदानंही हवीत. 
 
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील समस्या, प्रश्‍न आणि त्याअनुषंगाने विकासाच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. शहरातील समस्या नवीन नाहीत, त्या जुन्याच आहेत. या समस्या प्रामुख्याने नागरी सुविधांशी संबंधित असून त्यांची पूर्तता पालिकेच्या आर्थिक विषयाशी निगडित आहे. त्यामुळे पालिकेच्या एकूणच प्रशासकीय कामकाजात आर्थिक शिस्तीसह नागरी सुविधा पुरविण्यावर प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत, तोवर या समस्या कायम राहतील. रस्ते आहेत, पण त्यांची अवस्था बिकट आहे. वाढीव वस्त्यांमध्ये तर रस्तेही नाहीत. गटारी झाकलेल्या नाहीत, त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न कायम आहे. नियमित स्वच्छतेअभावी रोगराई पसरते. पाणीपुरवठा नियमित असला तरी तो शुद्ध स्वरूपाचा नाही. या प्रमुख समस्या सोडविण्यासाठी योग्य नियोजनच महत्त्वाचे आहे. 
शहरात प्रत्येक भागात मैदानांचा अभाव आहे. दोन-चार मैदानं सोडली तर मुलांना खेळायला जागा नाहीत. विविध प्रभागात ज्या मोकळ्या जागांवर क्रीडांगणाचे आरक्षण आहे, ते दूर करून या जागा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यात आल्या आहेत. काही जागांवर मोठ्या इमारती उभ्या आहेत, तर काही जागा मोकळ्या असल्या तरी त्यात घाणीचे साम्राज्य आहे. ज्या मैदानावर मुलांचा शारीरिक, मानसिक, नेतृत्वाचा विकास होतो... एकमेकांशी संवाद घडून सामाजिक सौहार्द निर्माण होते, ती मैदानंच शिल्लक नसल्याने मुलांनी खेळायचं कुठं? हा प्रश्‍न आहे. दोन-चार मैदाने त्या-त्या भागापासून दूर आहेत, त्याठिकाणी मुलांना जाणे शक्‍य नसते. त्यामुळे नव्याने निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी शहरातील प्रत्येक भागात मैदाने कसे तयार होतील, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. 
आर्थिक विकास दराबाबत चर्चा होत असते. मात्र, समाजाचा मानसिक विकास दर कुणी लक्षात घेत नाही. त्यासाठी शहरात सातत्याने सांस्कृतिक, बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन होत राहिले पाहिजे. जळगावात काही मोजक्‍या संस्था व मर्यादित कार्यक्रम सोडले तर असे कार्यक्रम होत नाहीत. महापालिका प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेऊन असे कार्यक्रम आयोजनाबाबत काही समित्या नेमून नियोजन केले पाहिजे. त्यातून समाजाचा मानसिक विकासही होऊ शकेल व समाजात चैतन्य कायम राहील. 
शहरात प्रत्येक भागात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः: उच्छाद मांडला आहे, त्यांची प्रचंड भीती असल्याने लहान मुलांना एकटे सोडणे कठीण झाले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्तही करणे आवश्‍यक आहे. हा मुद्दा थोडा वेगळा असला तरी तो महत्त्वाचा आहे. निवडणुकीच्या निमित्ताने होणारे राजकारण एकदा निवडून गेल्यानंतर पालिका सभागृहात तरी बाजूला ठेवून शहराच्या भल्याचा विचार झाला पाहिजे. 

Web Title: marathi news jalgaon opinian maker manoj