ओपिनियन मेकर - शहर भकास न करता त्याचा विकास करावा :  डॉ. शिल्पा बेंडाळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहराच्या समस्या कायम आहेत. महापालिकेत निवडून येणारे नगरसेवक व विरोधक यांनी येत्या काळात एकमेकांविरोधात न जाता एकमेकांना सहकार्य करून कामे करायला हवीत. प्राथमिक सुविधांसह प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. पक्षा-पक्षांमध्ये वाद करून शहर भकास न करता सर्वांच्या मदतीने व सहकार्याने शहराचा विकास केल्यास शहर पुन्हा एकदा नावारूपास येईल. 
 

गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहराच्या समस्या कायम आहेत. महापालिकेत निवडून येणारे नगरसेवक व विरोधक यांनी येत्या काळात एकमेकांविरोधात न जाता एकमेकांना सहकार्य करून कामे करायला हवीत. प्राथमिक सुविधांसह प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. पक्षा-पक्षांमध्ये वाद करून शहर भकास न करता सर्वांच्या मदतीने व सहकार्याने शहराचा विकास केल्यास शहर पुन्हा एकदा नावारूपास येईल. 
 
शहरात अनेक वर्षांपासून नागरी सुविधांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. प्रत्येक पाच वर्षांनंतर महापालिका निवडणुका होतात. त्यात नगरसेवक निवडून येतो. त्यानंतर सरळ तो आपल्या प्रभागात पुढच्या निवडणुकीवेळीच येतो. यात अनेक नगरसेवक वर्षानुवर्षे तेच आहेत, तरीही या समस्यांवर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तर वर्षे उलटली, तरीही आपण रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, गटार, आरोग्य या मूलभूत प्रश्‍नांसाठीच संघर्ष करत आहे, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यातही आपल्या शहरात या समस्या अधिक तीव्र बनल्या असून, त्याला राजकीय वाद कारणीभूत आहे. 
महापालिका नागरिकांकडून प्रत्येक गोष्टीचा कर आकारते. मात्र, त्याचे योग्य नियोजन होत नाही. यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते. शहरात कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प नाही. दररोज परिसरातून कचरा उचलला जातो, परंतु त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नाही. सांडपाण्याच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया नाही. सांडपाणी थेट गटारांमधून नाले व नद्यांमध्ये जाऊन नद्या प्रदूषित होते. भुयारी गटार नसल्याने शहरात रोगराई पसरते, तर रस्त्यांची परिस्थिती ही ग्रामीण भागातील रस्त्यांपेक्षाही खराब झाली आहे. मात्र यात देखील कामांचे नियोजन नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या समस्यांकडे लक्ष द्यायला नगरसेवकांना वेळ नसतो. किमान या सुविधांवर लक्ष केंद्रित केल्यास शहराचे नियोजन योग्यप्रकारे होऊ शकेल. यापेक्षा वेगळे नागरिकांना काही नको. रस्ते, पाणी, स्वच्छता, सांडपाणी, कचऱ्याचे व्यवस्थापन, आरोग्य याप लीकडे जाऊन नागरिकांना काहीही नको. 
महापालिका निवडणुकीत निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने येत्या पाच वर्षांत राजकारणात नव्हे; तर समाजकारणात लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक पक्षातील लोकांशी आपले संबंध जोपासून शहराचा विकास कसा होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. गेली अनेक वर्षे फक्त वादात आपण शहर भकास करत आलो आहोत. आता यापुढील काळात सर्वांनी एकत्र येऊन शहराचा विकास करावा. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात एक सेवक म्हणून म्हणून काम केल्यास विकासाला चालना मिळेल. 
 

Web Title: marathi news jalgaon opinian maker shilpa bendale