पाडळसे धरण पूर्ण झालेचं पाहिजे..! 

पाडळसे धरण पूर्ण झालेचं पाहिजे..! 

अमळनेर : जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खानदेशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे. पाडळसे धरण जनसंघर्ष समितीने यासाठी आंदोलन छेडले असून, उद्यापासून (ता. 25) सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धरणासाठी लोकप्रतिनिधींची कसोटी लागणार आहे. 
पाडळसे प्रकल्प 1995- 96 पासून मंजूर आहे. 1997 ला 142. 64 कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. 1999 ला 273.08 कोटींची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता, 2003 ला 399.46 कोटी रुपयांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता, 2009 ला 1127. 74 कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर आहे. त्यानंतर टप्प्या- टप्प्याने सुमारे 435 कोटींचा निधी धरणावर खर्च झाला असून, यात स्तंभ क्रमांक एक ते 23 (12 व 18) वगळून 140 मी. तलांकापर्यंत काम झाले आहे. त्यानंतर राज्यशासन भरघोस निधी देण्यास असमर्थ ठरल्याने धरणाचे बजेट हे तब्बल 2751.05 कोटींवर जाऊन पोचले आहे. यास केंद्रीय जलआयोगानेही मान्यता दिली आहे. धरणासाठी केंद्राकडून भरघोस निधी आणण्याचे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र, त्यातही बळीराजा सिंचन योजना व पंतप्रधान सिंचन योजनेतही धरणाचा समावेश होत नसल्याने हे धरण पूर्ण होण्याची आशा फोल ठरली आहे. यासाठी आता राज्यशासनाकडूनच मिळेल त्या निधीत धरणाचे काम रेटावे लागणार आहे. यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. त्यातच केंद्रातूनही निधी खेचून आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता पाडळसे धरणासाठी किती निधी मिळतो, याकडे अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा आदी तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागून आहे. 
 
साखळी उपोषणाने वेधले लक्ष 
बहुचर्चित व महत्त्वाकांक्षी पाडळसे धरण पूर्ण व्हावे यासाठी पाडळसे धरण संघर्ष समितीने शिवजयंतीपासून (ता. 19) तहसील आवारात साखळी उपोषण सुरू केले आहे. पाडळसे धरण झालेचं पाहिजेचा नारा शहरात चांगलाच घुमत आहे. समितीचे सुभाष चौधरी, माजी प्रभारी कुलगुरू प्रा. शिवाजीराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रा. सुनील पाटील, ऍड. तिलोत्तमा पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व शेकडो शेतकरी यात सहभागी झाले आहेत. त्यांना माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील आदींसह अनेक सामाजिक व महिला संघटनांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला आहे. या साखळी उपोषणानेही लक्ष वेधले असून, याचे काय फलित मिळते याकडे लक्ष लागले आहे. 

बंधाऱ्यात नाही, पण डोळ्यात येतंय पाणी..! 
एकीकडे पाडळसे संघर्ष समितीचे पाडळसे धरणासाठी, तर दुसरीकडे भिलाली (ता. पारोळा) येथील बोरी नदीवरील सर्वांत मोठ्या कोल्हापूर बंधाऱ्यासाठी शेतकऱ्यांचे पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. त्यांनी गुराढोरांसह बंधाऱ्यावर बस्तान बांधले आहे. बंधाऱ्याचे केवळ 15 टक्के काम बाकी असून, सुधारित प्रशासकीय मान्यतनेनंतरही बंधाऱ्याचे काम सुरू झालेले नाही. बंधाऱ्यात नाही पाणी...मात्र, त्यांच्या डोळ्यात पाणी दिसून येत आहे. आता शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com