पाकिस्तानात केळी निर्यात नाही ! 

पाकिस्तानात केळी निर्यात नाही ! 

रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी लागली, तरी चालेल किंवा भविष्यात अन्य देशात केळी निर्यातीच्या संधी शोधू पण पाकिस्तानात केळी निर्यात करणार नाही असा निर्धार करून जिल्ह्यातील केळी उत्पादक, व्यापाऱ्यांनी आपल्या राष्ट्रभक्तीचा परिचय करून दिला आहे. 

थंडी कमी होऊन तापमानात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात निर्यात होण्यास सुरवात झाली आहे. सध्या हे प्रमाण आठवड्याला चाळीस ते पन्नास ट्रक्‍स इतके आहे, लवकरच दर आठवड्याला शंभर ट्रक्‍सची मागणी पाकिस्तानातून नोंदविली जाणार होती. मात्र, काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल दुपारपासूनच जम्मू आणि श्रीनगर मार्गावरून पाकिस्तानात निर्यात होणारी केळीची वाहतूक ठप्प झाली आहे. अजूनही काही ट्रक जम्मू आणि श्रीनगर येथील पाकिस्तानच्या सरहद्दीवर उभे आहेत. तर असंख्य ट्रक जिल्ह्यातून काश्‍मीरमध्ये जाण्यासाठी निघाले असून ठिकठिकाणी रस्त्यावर पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत "सकाळ'ने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. तांदलवाडी येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रेमानंद महाजन म्हणाले की, पाकिस्तान मध्ये काल (ता. 14) पासून केळीची मागणी वाढली होती; यापुढील काळात ती आणखी आठवड्याला शंभर ट्रक्‍सपर्यंत वाढली असती. मात्र, आपल्यासाठी राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे. यापुढील काळात अरब आणि युरोप राष्ट्रात निर्यातीच्या संधी शोधू पण पाकिस्तानला निर्यात करणार नाही. महाराष्ट्र केला एजन्सीचे संचालक किशोर गनवाणी म्हणाले की, काल (ता. 14) दुपारपासूनच पाकिस्तानला जाणारी केळी निर्यात ठप्प झाल्याचे सरहद्दीवरील व्यापाऱ्यांनी कळविले आहे. सध्या ट्रकमध्ये भरलेली केळी व्यापाऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतच नुकसानीत विकावी लागेल. मात्र, पाकिस्तान मध्ये केळी निर्यातीचा प्रयत्न कोणीही व्यापारी बंधू करणार नाही. राष्ट्रहित हेच सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. 

अरब देशात निर्यातीसाठी प्रयत्न 
तालुक्‍यातील अटवाडा येथील प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी विशाल अग्रवाल यांनी सांगितले की, यापुढील काळात अधिकाधिक दर्जेदार केळी उत्पादन करून पाकिस्तान ऐवजी अरब देशात निर्यात करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहील. यापुढील काळात यापुढील काळात केळी उत्पादक शेतकरी पाकिस्तानच्या भरवशावर केळी उत्पादन करणार नाहीत. 
 
भारतातील ओरिसा आणि पश्‍चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये दर्जेदार केळीची मोठी मागणी यापूर्वीही होती आणि आताही आहे. पाकिस्तानमध्ये केळी निर्यात बंद झाली तरी भारतातील बाजारपेठेत आणि काळजीपूर्वक कापणी आणि हाताळणी केल्यास अरब देशातील निर्यातीत वाढ होऊ शकेल ज्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याशिवाय रशिया, जपान आणि कोरिया या मित्र राष्ट्रांमध्ये केळीची मागणी आहे. त्या देशात निर्यातीसाठी आपणही मदत करू. 
-के. बी. पाटील, केळी तज्ज्ञ, जैन इरिगेशन, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com