"नॉनस्टॉप' 22 तास ड्यूटी प्रकरण; विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांसह चौघांना नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून आरामदायी प्रवास करताना पुण्याहून तासाभरातच परतीच्या प्रवासाचा धोका पत्करला जात होता. यामुळे "नॉनस्टॉप 22 तास...' अशी एसटीच्या चालक- वाहकांची सेवा होत होती. या प्रकरणात मुंबईस्तरावरून मागविलेल्या अहवालावरून विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यासह जळगाव आगारातील तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावून समज देण्यात आली आहे. 

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून आरामदायी प्रवास करताना पुण्याहून तासाभरातच परतीच्या प्रवासाचा धोका पत्करला जात होता. यामुळे "नॉनस्टॉप 22 तास...' अशी एसटीच्या चालक- वाहकांची सेवा होत होती. या प्रकरणात मुंबईस्तरावरून मागविलेल्या अहवालावरून विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यासह जळगाव आगारातील तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावून समज देण्यात आली आहे. 
"प्रवासी हिताय- प्रवासी सुखाय' हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळाने सेवा सुरू ठेवली आहे. पण प्रवाशांच्या जिवाशी खेळ करून लांबपल्ल्याच्या बसफेऱ्यांना महामंडळाच्या नियमांत बसत नसताना जळगाव आगारातून पुण्याला जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या बस मुक्‍कामी न थांबविता त्याच दिवशी पुन्हा मार्गस्थ केल्या जात होत्या. हा प्रकार "सकाळ'ने "चालकाची ड्यूटी "नॉनस्टॉप' 22 तास...' या मथळ्याखाली उघडकीस आणला. या प्रकारानंतर जळगाव आगार व वरिष्ठ पातळीवरून विभागीय कार्यालयाची चौकशी होऊन फेऱ्यांबाबतचा संपूर्ण अहवाल मागविला होता. तर आगार स्तरावरून प्रथम फेऱ्या बंद करून पुणे येथे मुक्‍कामी राहण्याचे आदेश काढले. आगार स्तरावरून पाठविण्यात आलेल्या अहवालावरून यात प्रथम चालक- वाहकांना जबाबदार धरत त्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. यात आता वरिष्ठ पातळीवरून विभागीय वाहतूक अधिकारी यांच्यासह आगारप्रमुख, स्थानकप्रमुख यांना देखील नोटीस बजाविण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांना समज 
जळगाव- पुणे फेरीत चालक- वाहकाची नॉनस्टॉप 22 तास सेवा होत होती. नियमात न बसणाऱ्या या प्रकाराला आगार स्तरावरून तोंडी आदेश देऊन सेवा चालविण्यात येत होती. या प्रकरणी मुंबईच्या मुख्य कार्यालयाने मागविलेल्या अहवालावरून संबंधित अधिकारी जबाबदार धरण्यात आले आहेत. यामध्ये आगारप्रमुखांसह बसफेऱ्यांचे नियोजन करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नोटीस दिली आहे. या नोटिशीद्वारे केवळ समज देण्यात आली असून, नियमानुसार फेऱ्या लावण्याचे आदेशित केले आहे. 

जळगाव- पुणे दरम्यान नियमात नसताना चालविण्यात आलेल्या बसफेऱ्यांबाबत वरिष्ठ पातळीने अहवाल मागविला होता. या अहवालानुसार आगार स्तरावरील अधिकारी व चालक- वाहकांना जबाबदार धरण्यात आले असून, सर्वांनाच नोटीस देण्यात आली आहे. 
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon parivahan bus officer notice