समांतर रस्त्यांचा प्रश्‍न; "डीपीआर' मंजुरीसाठी अधिकाऱ्यांची दमछाक 

समांतर रस्त्यांचा प्रश्‍न; "डीपीआर' मंजुरीसाठी अधिकाऱ्यांची दमछाक 

जळगाव : शहरवासीयांच्या जिवावर उठलेल्या महामार्गाला पर्याय म्हणून समांतर रस्त्यांचे काम तातडीने हाती घेणे गरजेचे असताना या रस्त्यांच्या कामाचा "डीपीआर' मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींसह "न्हाई'च्या अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. सहा महिन्यांपासून निधीची तरतूद होऊनही समांतर रस्त्यांचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या या कार्यकाळात तरी कामाला सुरवात होईल का? असा प्रश्‍न जळगावकरांमधून उपस्थित होत आहे. 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्र. 6 वरील प्रचंड वाढलेली वाहतूक व अपघातांची संख्या पाहता महामार्गाचे चौपदरीकरण व समांतर रस्त्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. गेल्या सहा-सात वर्षांत तर हा प्रश्‍न कमालीचा जिव्हाळ्याचा बनला. दोन वर्षांत या कामासाठी जळगावकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. 
चौपदरीकरणाच्या कामात महामार्ग बायपास जात असल्याने शहरातील महामार्गासाठी विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांसाठी निधीची घोषणा केली. 

"डीपीआर' मंजुरी प्रलंबित 
दोनवेळा "डीपीआर' तयार केला. काही महिन्यांपूर्वीच नव्या प्रस्तावासह जवळपास 125 कोटींच्या निधीची तरतूद या कामासाठी करण्यात आली. त्या आधारे 141 कोटींच्या कामाचा नवीन "डीपीआर' तयार केला असून तो केंद्रीय स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहे. गेल्या महिन्यात रस्ते वाहतूक कार्यकारी समितीचे चेअरमन बदलले. नव्या चेअरमनने पदभार स्वीकारल्यानंतर दररोज विविध कामांचा निपटारा सुरू असून, जळगावातील समांतर रस्त्यांच्या "डीपीआर' मंजुरीसाठी "न्हाई'चे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, तरीही या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. 

जिल्हाधिकारीही प्रयत्नात 
गेल्या आठवड्यात खासदार ए. टी. पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे नितीन गडकरींच्या ओएसडींसोबत होणारी नियोजित बैठक ऐनवेळी रद्द झाली. आता ती बैठक कधी होते, याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हेदेखील या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. "न्हाई'चे अधिकारी, संचालक, संबंधित समितीचे चेअरमन यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फेब्रुवारी-मार्चमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता असल्याने हे काम तातडीने मंजूर होऊन कसे सुरू होईल, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com