जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिशीनंतरही पीक कर्ज देण्यासाठी चालढकल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

जळगाव ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने पीक कर्ज वितरणाची गती वाढविली आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मात्र जिल्हाधिकारी यांच्या नोटिशीनंतरही गती धीमीच ठेवली आहे. कहर म्हणजे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अनेक शाखांमध्ये पीक कर्ज वितरण बंद आहे. पीक कर्जासाठी ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये नवे प्रस्ताव येत आहेत. ते नाकारून जिल्हास्तरावर कृषी विकास शाखेत जा, बॅंकेतील कृषी अधिकाऱ्यांना भेटा, अशी उत्तरे व्यवस्थापक देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. 

गेल्या आठवड्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आठ टक्के पीक कर्जवाटप केले होते. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बॅंकांना नोटीस बजावली होती. यानंतरही कर्ज वितरण गतीने सुरू नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अद्याप पीक कर्ज वितरण फक्त 15 टक्‍क्‍यांपर्यंतच गाठले आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 555 कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. हे प्रमाण निश्‍चित पीक कर्ज वितरण उद्दिष्टाच्या 22 टक्के आहे. सर्वाधिक पीक कर्ज वितरण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केले आहे. या बॅंकेने सुमारे 44 हजार सभासदांना पीक कर्ज दिले आहे. जिल्हा बॅंकेने एकूण उद्दिष्टाच्या 39 टक्‍क्‍यांपर्यंत कर्ज वितरण केले आहे. जिल्हा बॅंक पीक कर्ज वितरण लवकरच पूर्ण करेल, असे सांगण्यात आले. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सुमारे 12 हजार शेतकरी सभासदांना 138 कोटी रुपये कर्ज वितरण केले आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 15 टक्केच आहे. 
भडगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा, यावल, चाळीसगाव, अमळनेर भागातील राष्ट्रीयीकृत बॅंका सभासदांना पीक कर्ज वितरणासंबंधी आडकाठी करीत आहेत. सर्च रिपोर्ट व इतर कागदपत्रांची मागणी करीत आहेत. यंदा कागदपत्रांसाठी अधिकची वणवण शेतकऱ्यांना करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. यातच अनेक शाखांनी पीक कर्ज वितरण बंद केले आहे. त्यामुळे देखील पीक कर्ज वितरणाची टक्केवारी फारशी वाढलेली नसल्याचे चित्र आहे. 

सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. ते लक्ष्य त्यांनी 30 जूनपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पीक कर्ज वाटपाबाबत बैठक बोलाविली जाईल. उद्दिष्ट पूर्ण न केल्यास कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. 
- किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी

Web Title: marathi news jalgaon pik karj bank notice