"एसपी' दत्ता शिंदेची तडकाफडकी बदली! 

"एसपी' दत्ता शिंदेची तडकाफडकी बदली! 

जळगाव, ता. 24 : अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी जळगाव पोलिस अधीक्षकपदी बदलून आलेल्या दत्ता शिंदे यांची तडकाफडकी बदल करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झाले नव्हते. या बदलीसाठी गृहखात्याने शिंदेंवर "लूज सुपरव्हिजन'चा ठपका ठेवल्याचे वृत्त असून या बदलीमुळे खळबळ उडाली आहे. 

सात महिन्यांपूर्वी 4 ऑगस्ट 2018 ला जळगावी दत्तात्रय कराळे यांची पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर दत्ता शिंदे यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार घेतला. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जळगाव शहरात नवीन अधिकारी येण्यास धजावत नाही, आणि थेट आयपीएस केडरचे अधिकारी अधीक्षक पदावर बसू नये यासाठीच प्रयत्नही असतात. परिणामी प्रमोशन झालेल्या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा सपाटा एस.जयकुमार यांच्यानंतर सुरू आहे. 

वादग्रस्त कारकीर्द 
जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर असताना श्री. शिंदे यांनी पोलिसदलाचे शुद्धीकरणाचा विडा उचलला होता. पोलिसदलात कार्यरत 78 प्रभावशाली कर्मचाऱ्यांना विशेष नवचैतन्य कोर्सला ओढल्याने राज्यभरात याची चर्चा झाली. मुरब्बी अधिकाऱ्यांना हटवून त्यांचा पदभार नवख्या अधिकाऱ्यांना सोपविण्याचा नवा पायंडा या कार्यकाळात रुळला. वाळूमाफियांची दादागिरी, दरोड्याचे गुन्हे, घरफोड्या, चोऱ्यांच्या गुन्ह्यात वाढ होत असताना पोलिस अधीक्षकांनी दलातील शिस्तीवर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले असतांना विमानतळावरील सुरक्षेत त्रुटीचा मुद्दा आणि अशातच काही वादग्रस्त घटना घडल्या. त्यातून पोलिसदलाच्या एकूणच "लूज सुपरव्हिजन'चा प्रत्यय आल्याचे मानले जात आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच आटोपलेल्या दौऱ्याची धूळही जमिनीवर पूर्ण बसलेली नसताना तीन दिवसांतच शिंदेंच्या बदलीचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली. 

उगले नवे अधीक्षक 
शिंदे यांच्या जागी नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत पंजाबराव उगले जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. रविवारी रात्री उशिरा गृहविभागाने या बदलीचे आदेश जारी केले. 

वजनदार नेत्याची तक्रार अन्‌ बदली 
जिल्ह्यातील एका वजनदार नेत्याने दत्ता शिंदेंबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे. फडणवीस नुकतेच जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्याच्या नियोजनात पोलिस विभागाकडून आयोजकांना बऱ्यापैकी त्रास झाला. शिंदेची सात महिन्यांतील कामगिरी, त्यासंबंधी तक्रारी व मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी झालेला त्रास, यामुळे या नेत्याने फडणवीस यांना त्यांच्या बदलीबाबत साकडेच घातले, त्यातून ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com