निकृष्ट पोषण आहार प्रकरणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

जळगाव : कन्हाळे (ता. भुसावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर विषबाधा झाली होती. या प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापिका, केंद्र प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

जळगाव : कन्हाळे (ता. भुसावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर विषबाधा झाली होती. या प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापिका, केंद्र प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

कन्हाळे (ता. भुसावळ) जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराबाबत जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी दोन दिवसांपूर्वी कन्हाळे शाळेत नऊ बालकांना पोषण आहार खालल्याने विषबाधा झाल्याच्या प्रकारानंतर शाळेस भेट दिली होती. तसेच धान्यादी मालाची तपासणी केली असता त्यात किडे व अळ्या आढळून आले होते. यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे निकृष्ट पोषण आहार धान्यादी मालाचे नमुने आणत ठेकेदार आणि पोषण आहार अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी किन्हीचे केंद्रप्रमुख रवींद्र तिडके यांच्यासह कन्हाळे शाळेच्या मुख्याध्यापिका कुंदा ओंकार पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. 

वीस शाळांनाही नोटीस 
अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी कन्हाळे पोषण आहाराच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने 42 शाळेतून धान्यादी मालाचे नमुने गोळाकरून ते सीईओंकडे सादर केले होते. त्यात 20 शाळांमध्ये निकृष्ट धान्य असल्याचे आढळून आले. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुखांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून खुलासा सादर केल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. 

ठेकेदारावर कारवाई कधी? 
भुसावळच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये निकृष्ट धान्यादी माल आढळून आला आहे. दोन दिवसापूर्वीच कन्हाळे येथे प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारात खालचे कर्मचारी म्हणजेच मुख्याध्यापकांना बळीचा बकरा बनविण्यात आले आहे. मात्र यातील खरे दोषी असलेले ठेकेदार, जे निकृष्ट माल पुरवत असून देखील त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात नाही. आज पोषण आहाराच्या प्रकरणी सीईओंकडून मुख्याध्यापकांवर कारवाई झाली. ठेकेदारावर केव्हा करणार अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon poshan aahar head master dismiss