निम्मे शाळांत पोषण आहार निकृष्ट ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

जळगाव ः कन्हाळे (ता. भुसावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्यानंतर शाळेत केलेल्या तपासणीत किडे व अळ्या आढळून आले होते. यानंतर तालुक्‍यातील शाळांची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने 42 शाळांची तपासणी केली असता, यातील वीस शाळांमधील पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. यामुळे अजूनही पोषण आहाराच्या पुरवठ्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. 

जळगाव ः कन्हाळे (ता. भुसावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नऊ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्यानंतर शाळेत केलेल्या तपासणीत किडे व अळ्या आढळून आले होते. यानंतर तालुक्‍यातील शाळांची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने 42 शाळांची तपासणी केली असता, यातील वीस शाळांमधील पोषण आहाराचे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. यामुळे अजूनही पोषण आहाराच्या पुरवठ्याबाबत जिल्हा परिषद प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरवठा होणाऱ्या पोषण आहाराच्या धान्यादी मालाच्या दर्जाबाबत दरवर्षी तक्रारी येत आहे. वारंवार तक्रारी होऊन देखील त्याची दखल प्रशासनाकडून घेतली न जाता धान्यादी मालाचा दर्जा सुधारला जात नाही. यात कन्हाळे (ता. भुसावळ) येथील शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन मालाची तपासणी केली. या तपासणीत धान्यामध्ये किडे व आळ्या असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे नमुने आणत ठेकेदार आणि पोषण आहार अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकारानंतर शाळांची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. 

शाळांत माल निकृष्टच 
जिल्हा परिषद प्रशासनाने चौदा जणांची समिती नेमली होती. एस. एम. पाटील (शाखा अभियंता), जी. एन. ठाकूर (कनिष्ठ अभियंता), पी. एल. धांडे (विस्तार अधिकारी), एस. डी. दांडगे (विस्तार अधिकारी), बी. डी. बोदडे (केंद्र प्रमुख दीपनगर), एस. डी. विसपुते (विस्तार अधिकारी), के. जी. तायडे (विस्तार अधिकारी), रवींद्र तिडके (केंद्रप्रमुख किन्ही), रागिणी चव्हाण (शिक्षण विस्तार अधिकारी), नलिनी झांबरे (केंद्रप्रमुख वरणगाव), तुषार प्रधान (विस्तार अधिकारी), अनिल सुरडकर (विस्तार अधिकारी) पथकात होते. समितीतील एका सदस्याने भुसावळ तालुक्‍यातील प्रत्येकी तीन याप्रमाणे 42 शाळांची आज तपासणी केली. या तपासणीत वीस शाळांमध्ये पुरवठा झालेला पोषण आहाराचा धान्यादी माल निकृष्ट अर्थात किडे व खराब असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा अहवाल समिती आणि सदस्या पल्लवी सावकारे यांनी प्रशासनाकडे सादर केला आहे. 

अन्‌ कन्हाळे शाळेत एक नंबरचा माल 
कन्हाळे (ता. भुसावळ) येथे मंगळवारी झालेल्या तपासणीत खराब माल आढळून आला होता. या प्रकाराची तक्रार झाल्यानंतर ठेकेदाराकडून लागोलाग माल बदलून दिला आहे. शाळेतील संपूर्ण खराब माल उचलून नेत त्या ऐवजी एक नंबरचा माल पुरवठा करण्यात आल्याचे आज झालेल्या तपासणीतून निदर्शनास आले. 

पोषण आहार अधीक्षकावर कारवाईची मागणी 
जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांनी शाळेतील मालाचे नमुने जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे धान्यादी मालाचे नमुने देऊन प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कारवाई करावी केली आहे. परंतु, अशा प्रकारचा माल पुरवठा करणे आणि तक्रार झाल्यानंतर कन्हाळे शाळेवरील माल बदलून देण्याचे काम झाले आहे. यास जबाबदार असलेल्या पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीमती. सावकारे यांनी केली आहे. 

पोषण आहार अहवालाची प्रतीक्षा 
चार तालुक्‍यात पोषण आहारात आढळून आलेल्या 1 लाख 67 हजाराच्या खोट्या बिल प्रकरणी सीईओंनी नवीन समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्ष अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आहेत. त्यांनी हा अहवाल 20 जुलैला देणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप सादर झालेला नाही. श्री. मस्कर हे 31 जुलैला निवृत्त होत असून, त्यांचे सेवेतील पाच दिवस शिल्लक राहिले आहे. यामुळे अहवाल कधी सादर होणार? याकडे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon poshan aahar school