सुकन्या' योजनेत जळगावची "समृद्धी' 

राजेश सोनवणे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जळगाव ः मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाते उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून जळगाव प्रथम क्रमांकावर आहे. 

जळगाव ः मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाते उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा जिल्ह्यांमधून जळगाव प्रथम क्रमांकावर आहे. 
भारतीय डाक विभागाने सध्याच्या गतिमान व बदलत्या युगा बरोबर चालताना आणि सामाजिक बांधिलकी म्हणून नवीन योजना व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागे पडत असलेल्या टपाल कार्यालयाच्या सेवा सर्वसामान्य व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. 

काय आहे योजना? 
या योजनेंतर्गत मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शून्य ते दहा वर्षे वयाच्या मुलीच्या नावे खाते उघडून तिचे उच्च शिक्षण व विवाह केल्यास त्यावर 9.1 टक्के एवढा भरघोस व्याजदर मिळणार आहे. योजनेत 250 भरून मुलींच्या नावाने आपल्या जवळच्या कोणत्याही टपाल कार्यालयात नवीन खाते उघडता येते. यात वार्षिक भरणा कमीत 250 रुपये तर जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपये भरणा करता येतो. गुंतवणूक केलेली रक्कम ही आयकर सवलतीस पात्र आहे. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी अर्धी रक्कम काढता येते. तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न झाल्यास सुकन्या खाते बंद करून पूर्ण रक्कम व्याजासहित मिळते. 

नऊ महिन्यात सहा हजार खाती 
या योजनेंतर्गत जळगाव विभागाच्या मुख्य डाक अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून एप्रिल 2018 पासून सहा हजार नवीन खाती उघडण्यात आली आहेत. 

दहा जिल्ह्यातून प्रथम 
राष्ट्रीय टपाल सप्ताहात औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जळगाव विभागाने औरंगाबाद विभागांतर्गत येणाऱ्या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वांत जास्त नवीन खाते उघडून प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीबद्दल औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्तर जनरल यांच्याकडून जळगाव डाक विभागाचे अधीक्षकांचा गौरव करण्यात आला. 
 

भारतीय डाक विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जळगाव डाक विभागात विशेष मोहीम राबविली जात असून, त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद विभागात जळगाव जिल्हा प्रथम असून आणखी खाती वाढवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा प्रयत्न असेल. 
- राजेश रनाळकर, डाक अधीक्षक, जळगाव विभाग. 

Web Title: marathi news jalgaon post office suknya yojna