"सिव्हिल'सह खासगी रुग्णालयातील "ओपीडी'ची झाली कमी! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

कोरोना व्हायरस'चा फैलाव होत असताना या रुग्णांमध्ये असलेली लक्षणे आणि "व्हायरस इन्फेक्‍शन'ने होणारा त्रास जवळपास सारखाच होता. यामुळे भीतीमुळे प्रत्येक जण तपासणीसाठी रुग्णालयात जात होता.

जळगाव : वातावरण बदल म्हणजे हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरवात होत असताना, अनेकांना याचा त्रास जाणवत असतो. यातच "कोरोना' आणि वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण होते. यामुळे पंधरा दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील "ओपीडी'ची वेळ वाढली होती. अर्थात, या "ओपीडी'चे प्रमाणही कमी झाले असून, "लॉकडाउन'मुळे खासगी रुग्णालयांतील "ओपीडी'ची वेळ देखील कमी आहे. 
"कोरोना व्हायरस' देशभरात पसरला असताना प्रत्येकात भीतीचे वातावरण आजही आहे. "व्हायरस'ची लागण कुठून होईल, हे सांगणे अवघडच होते. ते रोखण्यासाठी देश "लॉकडाउन' करण्यात आला. "कोरोना व्हायरस'चा फैलाव होत असताना या रुग्णांमध्ये असलेली लक्षणे आणि "व्हायरस इन्फेक्‍शन'ने होणारा त्रास जवळपास सारखाच होता. यामुळे भीतीमुळे प्रत्येक जण तपासणीसाठी रुग्णालयात जात होता. मात्र, खासगी रुग्णालय बंद असल्याने सर्व भार जिल्हा रुग्णालयावर आला होता. पण, आता हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. 

वातावरण बदलाचा परिणाम 
प्रामुख्याने हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरवात होत असताना, अनेकांना सर्दी, खोकला, ताप येण्याचे प्रमाण वाढत असते. अर्थात, वातावरण बदल हा अनेकांसाठी त्रासदायक ठरत असतो. यातच "कोरोना व्हायरस' आल्याने लक्षणे सारखी असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती होती. यामुळे तपासणीसाठी रुग्णालयात जात होते. परिणामी जिल्हा रुग्णालयातील "ओपीडी'वरील ताण वाढला होता. आता मात्र उन्हाचे चटके जाणवू लागल्याने "व्हायरल इन्फेक्‍शन'चे प्रमाण कमी झाल्याने तपासणीसाठी होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. 

येणे-जाणे थांबले 
"कोरोना व्हायरस'मुळे देशात "लॉकडाउन' असल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे थांबले. शिवाय, जिल्ह्यातून परदेशातून 252 नागरिक आणि पुणे- मुंबई येथील सुमारे 45 हजार नागरिक "कोरोना'च्या भीतीमुळे आले होते. ते सर्व काही ना काही त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी येत होते; परंतु गेल्या वीस दिवसांपासून जिल्ह्यात कोणी आले नाही आणि जिल्ह्यातून बाहेर कोणी गेले नसल्याने "कोरोना व्हायरस' पसरण्याचे थांबल्याचा चांगला परिणाम सध्या दिसू लागला आहे. 

"होम क्‍वारंटाइन'मधून 360 जण मुक्‍त! 
"कोरोना'चा प्रादुर्भाव वाढत असताना त्रास जाणवणाऱ्यांना "होम क्‍वारंटाइन' करण्यात आले होते. जिल्ह्यात अशा 722 जणांना 14 दिवस "होम क्‍वारंटाइन' करण्यात आले होते. यातील 360 जण चौदा दिवस घरात थांबल्यानंतर "क्‍वारंटाइन'मधून मुक्‍त झाले आहेत; तर सध्याच्या स्थितीत 252 जण "होम क्‍वारंटाइन' आहेत. 

गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून कोणीही बाहेरून येऊ शकले नाही, तसेच उन्हाळा सुरू झाल्याने जाणवणारा त्रास कमी झाल्याने रोजच्या तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. हे चांगले चित्र असून, वीस दिवसांत "होम क्‍वारंटाइन' करण्यात आलेल्यांमधील 80 टक्‍के यातून सुटले आहेत. 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 

"लॉकडाउन' असल्याने येण्यासाठी कोणत्याही प्रकारे वाहनाची सुविधा नसल्याने अतिआवश्‍यक असलेले रुग्णच तपासणीसाठी येत आहेत. यामुळे साधारण 50 टक्‍के "ओपीडी' कमी झाली आहे. शिवाय, इमर्जन्सी सर्जरीच होत असल्याने लांबविता येणारी शस्त्रक्रिया थांबविली आहे. 
- डॉ. पराग चौधरी, एमडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon private and civil hospital opd limited