खानदेशात दुष्काळमुक्‍तीसाठी  जैन संघटनेचे एक पाऊल पुढे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

खानदेशात दुष्काळमुक्‍तीसाठी 
जैन संघटनेचे एक पाऊल पुढे 

खानदेशात दुष्काळमुक्‍तीसाठी 
जैन संघटनेचे एक पाऊल पुढे 

अमळनेर : संपूर्ण राज्य पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा होत आहे. यास भारतीय जैन संघटनाही पुढे सरसावली असून, त्यांनी दातृत्वातून मोफत जेसीबी उपलब्ध करून दिले आहे. 
तालुक्‍याचा अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो. तालुक्‍यातून तापी, बोरी, पांझरा या तीन नद्या गेल्या असल्या, तरी नदी काठाला आणि कोरड घशाला अशी विदारक परिस्थिती आहे. दुष्काळमुक्‍तीतून बाहेर काढण्यासाठी पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्‍यातील 49 गावांचा समावेश आहे. समाजाचे आपण देणे लागतो या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्‍तीसाठी एक पाऊल पुढे करत जलसंधारणासाठी "जेसीबी' व "पोकलेन मशिन' मोफत दिले आहे. त्यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे जवखेडा (ता. अमळनेर) येथे सिनेअभिनेते आमीर खान व किरण राव यांनी तालुका भारतीय जैन संघटनेचा सन्मानही केला आहे. 
राज्यातील 24 जिल्ह्यांत 75 तालुक्‍यातील सुमारे तीन हजार गावे दुष्काळमुक्‍त करण्याचे भारतीय जैन संघटनेचे ध्येय आहे. यासाठी तालुक्‍यातील दहा गावांमध्ये बारा "जेसीबी' मशिन देऊन जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. वॉटर कप स्पर्धेत ज्या गावांनी श्रमदानाने पंधरा गुणांचा टप्पा पार केला आहे अशा गावांना या संघटनेकडून हे मशिन मोफत देण्यात आले आहे. तहसीलदार प्रदीप पाटील, प्रकाश जैन, विनोद जैन, गणेश कोळी, डॉ. रवींद्र जैन, सचिन ओस्तवाल, सचिन चोपडा, प्रा. अरुण कोचर, धर्मेंद्र कोठारी, सुरेंद्र कोठारी, पियुष ओस्तवाल आदींचे सहकार्य लाभले. 

 
या गावांचा आहे समावेश 
जवखेडा, नगाव बुद्रुक, नगाव खुर्द, गांधली, शिरूड, रणाईचे, पातोंडा, कुऱ्हे, पळासदडे, दोधवद या गावांमध्ये जेसीबीच्या साह्याने अनेक जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी सुरू आहेत. संघटनेकडून मोफत मशिन देण्यात आले असले, तरी डिझेलचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दातृत्वाला लोकसहभागाची जोड दिसून येत आहे. प्रत्येक गावाला शासनाकडून इंधनाच्या खर्चासाठी दीड लाख रुपये देण्यात येणार असल्याने अनेक कामे मार्गी लागणार आहेत. 
 ..............
संपूर्ण राज्य पाणीदार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून लोकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यात भारतीय जैन संघटनेने खारीचा वाटा उचलला आहे. 
- प्रकाश छाजेड, तालुका प्रकल्प अध्यक्ष, जैन संघटना 

Web Title: marathi news jalgaon pudhe