पुलवामा हल्ल्यातील वीर पत्नींना जळगावातून 22 लाखांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये निधी संकलित झाला असून, 12 एप्रिलला दोन्ही वीर पत्नींना तो देऊन सन्मानित केले जाईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दिली. 

मंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जनता बॅंकेचे हेमंत चंदनकर, केशवस्मृती प्रतिष्ठानचे स्वप्नील चौधरी यावेळी उपस्थित होते. नगरसेवक सोनवणे यांनी सांगितले, की पाकिस्तानच्या भ्याड कृतीविरुद्ध लढा देण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंडळातर्फे शहरातून रॅली काढण्यात आली. पुलवामा हल्ल्यात मलकापूर येथील शहीद संजयसिंह राजपूत आणि चोरपांगरा येथील नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाने हाती घेतलेल्या सहवेदना निधी संकलन उपक्रमात आजपर्यंत 12 लाख आठ हजार 458 रुपये निधी संकलित झाला आहे. तसेच ग. स. सोसायटीकडून दहा लाख रुपये कार्यक्रमाच्या दिवशी देण्यात येणार आहेत. असे एकूण बावीस लाख रुपये निधी संकलित झाला असून, हा निधी दोन्ही वीर पत्नींना समान देऊन सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी जळगाव जनता सहकारी बॅंकेचे विशेष सहकार्य आहे. 

मेजर जनरल बक्षींचे व्याख्यान 
मंडळातर्फे संकलित निधी त्या वीर पत्नींना 12 एप्रिलला सायंकाळी सहाला कांताई सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात देऊन सन्मान करण्यात येईल. या कार्यक्रमास निवृत्त भारतीय लष्करी अधिकारी मेजर जनरल जी. डी. बक्षी उपस्थित राहणार असून, ते "दहशतवाद कल, आज और कल' या विषयावर व्याख्यान देणार आहेत. प्रखर राष्ट्रवाद, पाकिस्तानच्या कुरापती आणि भारतीय सैनिकांची शौर्यगाथा सांगणारे आणि मनामनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे हे व्याख्यान आहे. तरी जळगावकर देशप्रेमींनी याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सोनवणे यांनी केले आहे. 

Web Title: marathi news jalgaon pulwama attack hutatma javan family 22 lakh