धक्‍कादायक : "क्वारंटाइन' अठरा जण झोपले रुग्णालयाच्या वऱ्हांड्यात! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

रुग्णालयाबाहेर वऱ्हांड्यात पहाटे तीनपर्यंत तसेच सोडून देण्यात आले. चिमुरड्यांसह असलेल्या या कुटुंबीयांना पूर्ण रात्र अन्न-पाण्याविना काढली. पहाटे बाहेरून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली. महापालिका प्रशासन मात्र निद्रिस्त होते. 

जळगाव : शहरात एक बाधित रुग्ण आढळला आणि जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील 18 सदस्यांना ज्या महापालिका रुग्णालयात "क्वारंटाइन' करण्यात आले आहे, तेथे त्यांना चक्क रुग्णालयाबाहेर वऱ्हांड्यात पहाटे तीनपर्यंत तसेच सोडून देण्यात आले. चिमुरड्यांसह असलेल्या या कुटुंबीयांना पूर्ण रात्र अन्न-पाण्याविना काढली. पहाटे बाहेरून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली. महापालिका प्रशासन मात्र निद्रिस्त होते. 

नक्‍की वाचा - स्पेशल रिपोर्ट : "त्या' कोरोनाग्रस्तचा हजारो किलोमीटरचा प्रवास झोप उडवणारा!

शहरातील 49 वर्षीय रुग्ण कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचा अहवाल येताच प्रशासनाचीही झोप उडाली. रुग्णाच्या कुटुंबातील आणि जवळच्या संपर्कातील 18 जणांना रुग्णालयात बोलावून घेतले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात हे लोक थांबून होते. प्रशासनाच्या बैठकीनंतर त्यांना महापालिकेच्या एका रुग्णालयात "क्वारंटाइन' करण्याचा निर्णय झाला. त्यांना तेथे पाठविण्यात आले. काही डॉक्‍टर, कर्मचारीही सोबत गेले. महापालिकेने खासगी संस्थेला संचलनासाठी दिलेल्या या रुग्णालयात त्यांना ज्या गोपनीय पद्धतीने ठेवायला हवे होते, तसे झाले तर नाहीच उलट महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि चिमुरड्यांसह त्यांना रुग्णालयाच्या बाहेरच वऱ्हांड्यात सोडून देण्यात आले. पहाटे तीन वाजता त्यांच्यापैकी एकाने पिण्यासाठी पाणी विचारले... मात्र, तशी कुठलीही व्यवस्था त्याठिकाणी नव्हती. त्यापैकी एकाने मोबाईलवरून नातलगाशी संपर्क करत पाणी मागवून घेतले. 

यंत्रणा निद्रिस्त 
पाणी घेऊन आलेल्या सदस्याने रुग्णालयातील सुरक्षारक्षकास ग्रीलच्या जाळीतून विचारणा केली. त्याने "आमचा काही संबंध नाही.. "कोरोना'चा वॉर्ड वेगळा आहे व त्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाची असल्याचे सांगितले. येथेच शाब्दिक चकमक उडाल्यावर या सर्वांना आत घेण्यात आले.. भुकेल्या कुटुंबीयांना एका तरुणाने घरातून उरलेली खिचडी आणली. मात्र, तोपर्यंत रुग्णालयाचे चॅनल गेट बंद करून सुरक्षारक्षक निघून गेला होता. 
 
यंत्रणेला नाही गांभीर्य 
प्रशासनाला अद्यापही कुठल्याच बाबीचे गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. देशभर कोरोना धुमाकूळ घालत असताना जिल्हा रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डात "क्वारंटाइन' केलेले रुग्ण राहूच शकत नाही, अशी अवस्था होती. माध्यमांनी यावर बोट ठेवल्यावर नुकतेच नेत्ररुग्णालयाला तयार करण्यात आले. काल रात्रीच्या या प्रकारावरून महापालिका व एकूणच आरोग्य यंत्रणा गंभीर नसल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon quarantine 18 people sleep hospital open aria