जळगावच्या प्रश्‍नांबाबत पालकमंत्री उदासीन : डॉ. चौधरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जळगाव : विद्यार्थी चळवळीत पूर्णवेळ जिल्ह्यात असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे पालकमंत्री म्हणून जळगावसाठी वेळ नाही. त्यांचा अधूनमधून होणारा दौरा पर्यटनापुरता होतो की काय, अशी शंका येते. जळगाव शहरातील प्रश्‍नांबाबत ते उदासीन असून एकनाथराव खडसेंकडे पालकमंत्रिपद असते, तर जळगावचे चित्र वेगळे दिसले असते, असे मत कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी व्यक्त केले. 

जळगाव शहरातील प्रमुख प्रश्‍नांबाबत रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना ते बोलत होते. डॉ. चौधरी म्हणाले, की खरेतर चंद्रकांत पाटलांनी जिल्ह्यात विद्यार्थी चळवळीत पूर्णवेळ काम करताना सायकल, बस, मोटारसायकलवर प्रवास केला. खडसेंच्या मंत्रिपदानंतर त्यांच्याकडे पालकमंत्री आले, दोघा "भाऊं'मध्ये समन्वय साधत ते जळगाव शहरासह जिल्ह्याचा विकास साधतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा सर्वच स्तरावर फोल ठरली आहे. 

एक तरी काम दाखवावे 
पालकमंत्री म्हणून गेल्या दोन वर्षांत जळगाव शहरातील किमान एक तरी प्रश्‍न चंद्रकांत पाटलांनी सोडविला का? असा प्रश्‍न उपस्थित करत डॉ. चौधरी म्हणाले, की हॉकर्सचा प्रश्‍न, दोन हजारांवर गाळे कराराच्या नूतनीकरणाचा तिढा, "हुडको'ची कर्जफेड, समांतर रस्त्यांचा प्रश्‍न, शहरातील प्रलंबित रेल्वे उड्डाणपूल यापैकी कोणत्याही प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री आणि देशातील क्रमांक दोनच्या नेत्याशी जवळीक असलेल्या चंद्रकांत पाटलांना हे प्रश्‍न सोडविता येत नसतील, त्यांच्याकडे वेळ नसेल तर त्यांनी पालकमंत्रिपद सोडलेलेच बरे. 

खडसेंकडेच हवे पालकमंत्रिपद 
खडसेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर जळगाव जिल्हा वाऱ्यावर आहे. चंद्रकांत पाटलांना जळगावचे प्रश्‍न जाणून घ्यायला वेळच नाही. पर्यटकासारखे ते महिना-दोन महिन्यांतून येतात, एखादी बैठक घेतात आणि "खुशाली' विचारत निघून जातात. खडसेंकडे विविध प्रश्‍न, कामे मार्गी लावण्याची हातोटी आहे. त्यांच्याकडे पद असते तर जिल्ह्याचे चित्र वेगळे दिसले असते, असा टोलाही डॉ. चौधरींनी लगावला. 

Web Title: marathi news jalgaon radheshyam choudhari chandrkant patil