रेल्वेतील छोट्याशा प्रेमकहाणीचा कोठडीत अंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

जळगाव : पुण्याहून सीआरपीएफच्या भरतीसाठी गेलेल्या तरुणाची परतीच्या प्रवासात रेल्वेत अल्पवयीन तरुणीशी ओळख होते.. तरुणी निराधार असल्याचे सांगते.. तरुणाचे हृदय पाझरते.. जळगावात आल्यावर तो तिला मित्राच्या खोलीत थांबवतो.. दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटतो, लग्नाचा निर्णयही ते घेतात.. त्यातून तारुण्यातील चूक होऊन जाते.. चूक उमगल्यावर तरुणीस तिच्या गावी पाठवतो, मात्र ती विनातिकीट पकडली जाते, नागपूर जीआरपी विश्‍वासात घेऊन चौकशी करतात... ती इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध राखल्याची तक्रार देते, त्यावरून गुन्हा दाखल होऊन तरुणास अटक होते आणि तो पोलिस कोठडीत जातो.. 

एखाद्या चित्रपटातील कथानकासारखी ही घटना नुकतीच समोर आली आहे. कोलकता (पश्‍चिम बंगाल) येथील 16 वर्षीय माया धुमल दलाल (काल्पनिक नाव) या तरुणीचे आई-वडिलांशी भांडण होऊन ती 20 एप्रिलला घर सोडून निघून गेली होती. इकडे शासकीय नोकरीच्या शोधार्थ असलेला अतुल गावित (वय-21, रा.नवापूर) हा शिक्षणासाठी जळगावात स्थायिक असून तो, सीआयएसएफच्या परीक्षेसाठी पुण्याला गेला होता. तेथून परतत असताना रेल्वेत त्याची मायाशी ओळख झाली. 

.. अन्‌ अतुलचे हृदय पाझरले 
मायाची दु:खद कथा ऐकून अतुलने तिला मदतीचे आश्‍वासन देत जळगावात आणले. दोन दिवस माया आणि अतुल मित्रांच्या खोलीवर राहिले. दोघांनी प्रेमाच्या आणा-भाका घेत लग्नाचा निर्णय घेतला. माया सोळाच वर्षांची असल्याने त्याने तिला हावडाचे तिकीट काढून तिसऱ्या दिवशी रवाना केले. मात्र ती, घरी न जाता अर्ध्याच प्रवासातून परतली. "मला तुझ्यासोबत राहायचेय... मी कुठेतरी नोकरी करीन' असेही ती सांगू लागली. त्यावर अतुल तिला बहिणीकडे घेऊन गेल्यावर बहिणीने मायाला घरी सोडण्याचा सल्ला दिला. 

आणि प्रकरण गेले पोलिसांकडे 
अतुल व त्याच्या मित्रांनी पुन्हा मायाला 10 मेस हावडा एक्‍स्प्रेसने तिच्या गावाकडे रवाना केले. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर असताना टीटीईने मायाला तिकीट नसल्याने नागपूरच्या चाईल्डलाईन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. वैद्यकीय तपासणी आणि कार्यकर्त्यांनी विश्‍वासात घेत तिला विचारणा केल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध झाल्याचे निदर्शनास आल्यावरून नागपूर लोहमार्ग पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

प्रेमवीराच्या नशिबी कोठडी 
पीडितेसोबत जळगावात हॉटेलमध्ये आणि अतुलच्या बहिणीच्या घरी अत्याचार झाल्याचे त्या तरुणीने तक्रारीत नमूद केले. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पाटी बेडकी गावातून अतुल गावित यास ताब्यात घेतले. अटकेनंतर गुन्ह्याचे घटनास्थळ जळगाव असल्याने नागपूर पोलिसांनी त्यास जळगावात आणून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका कोडापे तपास करीत आहेत. 
 
Web Title: marathi news jalgaon railway love