अनधिकृत विक्रेत्यांचा रेल्वेसह स्थानकांना विळखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

जळगाव ः रेल्वेत खानपान विभागाकडून प्रवाशांची लूट होते, त्यातच रेल्वे स्थानकावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा दुप्पट- तिप्पट संख्येने अनधिकृत विक्रेते खाद्यपदार्थांची विक्री जादा दराने करून लूट करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. रेल्वेगाड्यांसह स्थानकांवर अशा विक्रेत्यांच्या गॅंगच तयार झाल्या असून प्रशासनातील अधिकाऱ्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. 

जळगाव ः रेल्वेत खानपान विभागाकडून प्रवाशांची लूट होते, त्यातच रेल्वे स्थानकावर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा दुप्पट- तिप्पट संख्येने अनधिकृत विक्रेते खाद्यपदार्थांची विक्री जादा दराने करून लूट करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. रेल्वेगाड्यांसह स्थानकांवर अशा विक्रेत्यांच्या गॅंगच तयार झाल्या असून प्रशासनातील अधिकाऱ्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याचे बोलले जाते. 

रेल्वेच्या खानपान विभागातर्फे प्रवाशांना जादा दराने खाद्यपदार्थांची विक्री होते. ही बाब हेरून अनधिकृत विक्रेते सर्रास भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, शेगाव, मलकापूर, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, रावेर, बऱ्हाणपूर अशा मोठ्या स्थानकांवर रेल्वे गाडीचे आगमन होण्याच्या पाच मिनिटे अगोदर येतात. गाडी येताच "ए वडापाव.., ए ऑम्लेट..., ठंडा कोल्ड्रिंक..., गरमागरम पकोडे...' आदी घोषणांनी रेल्वे स्थानक दणाणून सोडतात. प्रवासीही पदार्थ घेतात. मात्र त्याचा दर्जाही नसतो. वडापाव, भजे तयार करताना बेसनाचे पिठा ऐवजी 90 टक्के ज्वारीचे पीठ वापरले जाते. काही पदार्थांना आंबट दुर्गंधी येते. ऑमलेटमध्ये कोंबडीच्या अंड्याऐवजी दुसऱ्याच प्राण्याची अंडी वापरली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. 
 
अधिकृत वेंडर तरीही.. 
प्रत्येक रेल्वे स्थानकावर अधिकृत वेंडर ठरवून दिलेले जातात. त्यांना ठरावीक रंगाचा शर्ट त्यावर क्रमांक दिलेला असतो. लोटगाडीवर माल ठेवून विकणारा असेल तर त्या गाडीला क्रमांक दिलेला असतो. असे असताना अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री करणारे येतातच. त्यांच्या अंगावर ठराविक रंगाचा ड्रेस नसतो. असला तर त्यावर क्रमांक नसतो. वेंडरांना रेल्वे स्थानकावर विक्री करण्यास परवानगी देणारे अधिकारी असतात. मग अनधिकृत वेंडर येतात कोठून? आले तरी गाडी जाताच ते लागलीच बेपत्ताही होतात. रेल्वे अधिकारी, स्टेशन निरीक्षक, स्टेशन निरीक्षक, आर.पी.एफ., जी.आर.पी.पोलिस यांच्या मूक सहमतीने या वेंडरची स्थानकावर चलती दिसते. 

बिस्कीट पुडे, "विमल'च्या पुड्याही 
रेल्वे स्थानक, रेल्वेच्या डब्यात अनधिकृत खाद्यपदार्थ, विविध वस्तू विक्रेते शिरून विक्री करतात. त्यांच्याकडे ठरावीक कंपनीचे बिस्कीट नसतो. असला तरी त्यावर असलेल्या किमतीपेक्षा पाच रुपयांनी अधिक दराने तो विकला जातो. इतर कंपनीचे दर्जाहीन असलेले बिस्किटे विकले जातात. महाराष्ट्रात "विमल'च्या गुटख्याला बंदी असताना रेल्वे स्थानक, रेल्वेच्या डब्यात सर्रास गुटख्याची विक्री होते. रेल्वेचे पोलिस, जी.आर.पी., गाडीतील टी.सी.च्या सहमतीनेच डब्यात विक्री होते. एरवी आरक्षणाच्या डब्यात इतर कोणी आला तर त्याला दंड केला जातो. हे विक्रेते सर्रास रेल्वेगाडीतील रेल्वे डब्यांतून फिरतात.

Web Title: marathi news jalgaon railway station