दहा हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी थोडा दिलासा दिला असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही, त्यामुळे दोन दिवसांत चांगला पाऊस आला नाही तर 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल. 

जळगाव : गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जळगाव जिल्ह्यातील 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके धोक्‍यात आली आहेत. श्रावण सरींनी थोडा दिलासा दिला असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही, त्यामुळे दोन दिवसांत चांगला पाऊस आला नाही तर 10 हजार हेक्‍टर क्षेत्रावर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल. 
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातच यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैत पहिल्या दोन आठवड्यात थोडा पाऊस झाला, मात्र तो नदी-नाल्यांना पूर येईल, असा नव्हता. सुरवातीपासूनच चांगला पाऊस न झाल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ठणठणाट असून अशी स्थिती राहिल्यास पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. 

पिके धोक्‍यात 
दुसरीकडे जून महिना कोरडा गेल्यानंतर थोड्याफार पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. शासकीय आकडेवारीनुसार 91 टक्के पेरण्या झाल्याची नोंद आहे, प्रत्यक्षात 100 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र आता तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था बिकट आहे. हलक्‍या जमिनीवरील जवळपास 10 हजार हेक्‍टर क्षेत्रातील पिके पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत असून त्यात प्रामुख्याने उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. वरुन पिके हिरवीगार दिसत असली तरी त्यावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. 

निम्मे तालुके प्रभावित 
जिल्ह्यातील जवळपास निम्मे तालुक्‍यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तसेच अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्‍यांमध्ये पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. काही भागात ठिबक व तुषार सिंचनाने पिके तग धरुन आहेत. मात्र, ही स्थिती फार काळ टिकून राहणारी नाही. मध्यम व भारी स्वरुपाच्या जमिनीत गेल्या महिन्यातील पावसाची ओल अद्यापही कायम आहे. त्यामुळे या जमिनीवरील पिके सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र, त्यांनाही आता जोरदार पावसाची आवश्‍यकता आहे. 
 
25 टक्के घट निश्‍चित 
आषाढ अमावस्येनंतर पाऊस परतण्याची चिन्हे होते. हवामान खात्याने ही स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविल्याने शेतकरी हवालदिल झालेत. श्रावण लागल्यापासून जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. आता दोन-तीन दिवसांत पाऊस परतला आणि चांगला बरसला तरी पिकांना जीवदान मिळेल, मात्र 25 टक्के उत्पन्न घटणार असल्याचे सांगितले जात आहे. 

बोंडअळीचे सावट कायम 
दुसरीकडे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही गुलाबी बोंडअळीचे सावट कायम आहे. प्रामुख्याने पूर्वहंगामी लागवड झालेल्या कापसावर बोंडात आणि फुलोऱ्यात अळी दिसून येत आहे. पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र जवळपास 50 ते 60 हजार हेक्‍टर असून साधारण 110 गावांमधील जवळपास 8-10 हेक्‍टर क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

येत्या दोन-चार दिवसांत पाऊस अपेक्षित आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत असून त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल. पण, चांगला पाऊस आला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. बोंडअळीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुकानिहाय कार्यक्रम सुरु केले आहेत. 
- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक 

Web Title: marathi news jalgaon rain not drop 10 thausand hector