राजकारण केले असते तर "अमृत' योजना मिळालीच नसती : भाजप नेते एकनाथ खडसे

राजकारण केले असते तर "अमृत' योजना मिळालीच नसती : भाजप नेते एकनाथ खडसे

जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते. अशा अनेक योजना मंजूर करून केवळ योग्य नियोजन न झाल्याने जळगाव शहराची ही अवस्था झाली, असा दावा माजी मंत्री तथा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. 
जळगाव पालिकेतील कथित गैरव्यवहाराविरोधात सातत्याने अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या खडसेंशी या निवडणुकीच्या निमित्ताने संवाद साधला असता ते "सकाळ'शी बोलत होते. 

प्रश्‍न ः आपण पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात सातत्याने विरोधाचीच भूमिका घेतली? 
उत्तर
ः मी कोणत्याही व्यक्तीविरोधात भूमिका कधीही घेतली नाही. पालिका असो की जिल्हा बॅंक अथवा अन्य संस्था तेथील गैरव्यवहारांविरोधात सातत्याने आवाज उठविला. गैरव्यवहार करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आपण लढा दिला. ती विरोधाची नव्हे तर भ्रष्टाचाराच्या विरोधातील भूमिका होती, आणि आजही कायम आहे. 

प्रश्‍न ः आपल्या नगराध्यक्षाच्या काळापासून विकास थांबल्याचा आरोप होतो? 
उत्तर
: सन 2001 मध्ये भाजपचा नगराध्यक्ष जळगावकरांनी निवडून दिला, पण बहुमत नव्हते. अवघ्या सोळा महिन्यांच्या काळात काय कामे होणार? जी चुकीची कामे झाली, ती आम्ही थांबविली. परंतु तेव्हा विकास थांबल्यानंतर सोळा वर्षे निघून गेली. या सोळा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय बोंब पाडली? 

प्रश्‍न ः विकासाच्या कामांमध्ये आपण राजकारण केल्याची टीका होते? 
उत्तर
ः पालिका असताना वाघूर धरणातून जळगाव शहराला पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव समोर आला. मात्र, या धरणातून शहरासाठी पाणी देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्या स्थितीत आपण या धरणाची उंची दोन मीटरने वाढविण्यास मंजुरी दिली. आता 2005-16 मध्ये "अमृत' योजनेच्या समावेशाबाबत शहरांची यादी मागविण्यात आली. त्यात जळगाव व भुसावळचे नाव आपण समाविष्ट करायला लावले. पालकमंत्री असताना नियोजन समितीच्या माध्यमातून मेहरुण तलाव सुशोभीकरणासाठी एक कोटी, दलितवस्ती विकास योजनेंतर्गत दोन कोटींचा निधी तातडीने मंजूर केला. 

प्रश्‍न ः समांतर रस्त्यांच्या विषयात आपण अडथळा आणला का? 
उत्तर
ः गरज नसताना पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत समांतर रस्ते करण्याचे सांगितले. तेव्हापासून हा विषय रखडला. सागर पार्कवरील सभेत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसमोर समांतर रस्ते, शिवाजीनगर व पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचा विषय मांडला. त्यांनी तो लगेच मान्य केला. शहराबाहेरून महामार्ग गेल्यानंतर शहरातील मार्गाची जबाबदारी पालिकेची असताना दोन्ही खासदार ए. टी. पाटील व रक्षाताई यांच्यासह आपण गडकरींची भेट घेतली, चारवेळा बैठका दिल्लीत झाल्या. त्यानंतर समांतर रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला. 

प्रश्‍न ः फुले मार्केटच्या जागेबाबत आपण राजकारण केल्याचा आरोप होतो? 
उत्तर
: ही जागा महसूल विभागाने तत्कालीन पालिकेला आठवडे बाजाराच्या प्रयोजनासाठी दिली होती. तशा नोंदी उपलब्ध आहेत. पालिकेने नियमबाह्यपणे या जागेचे प्रयोजन बदलले, पक्के संकुल बांधले. महसूलची जागा म्हणून ती ताब्यात घेण्याचे आदेश आपण दिले. मंत्रिपदी असतो तर गाळेप्रश्‍न कधीचाच मार्गी लावला असता. पालिकेचे नुकसान न होऊ देता व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला असता. 

प्रश्‍न ः सरकारकडून पालिकेच्या कामात अडथळा आणला जातो का? 
उत्तर
: सरकार कोणतेही असो, ते असे करू शकत नाही. पालिकेत ज्याची सत्ता आहे त्याला विकासाचे व्हीजन व इच्छाशक्ती असली पाहिजे. 30 वर्षे सत्ता उपभोगून तुम्ही सरकारच्या नावाने खडे फोडत बसाल तर त्याला "नाचता येईना अंगण वाकडे..' असेच म्हणावे लागेल. 

प्रश्‍न : व्यक्तिगत द्वेषापोटी आपण भ्रष्टाचाराचे आरोप करता, यात तथ्य आहे का? 
उत्तर
: कुणाशी व्यक्तिगत द्वेष? आपण पालिकेतील भ्रष्टाचारी प्रवृत्तींविरोधात लढलो. केवळ आरोप केले नाहीत, पुरावे सादर केले. आपल्या आरोपांमध्ये तथ्य होते, म्हणून चौकशा लागल्या. चौकशीत तथ्य आढळले म्हणून गुन्हे दाखल झाले, गुन्ह्यांच्या तपासात गंभीर प्रकार समोर आले म्हणून त्यांना कारागृहात जावे लागले. 

प्रश्‍न : आणखीही गंभीर प्रकरणे प्रलंबित आहेत का? 
उत्तर
: होय, अनेक तक्रारींमध्ये चौकशी पूर्ण झाली आहे. गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणांचा तपासही झाला असून त्यासंबंधी कारवाई अटळ आहे. सध्या ही बाब मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणांमधील तथ्ये मुख्यमंत्र्यांना आणि मलाही माहीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठरविले तर या प्रकरणांमध्ये कारवाई होणार व आजी-माजी नगरसेवकांना आत जावे लागणार, हे नक्की! 

प्रश्‍न : त्यांचे उमेदवार आपल्या पक्षातून लढताहेत, त्याबद्दल काय सांगाल? 
उत्तर
: आता पक्षाने ठरविले म्हणून अशा उमेदवारांना पक्षात प्रवेश मिळाला. याचा अर्थ ते सर्वच उमेदवार चांगले आहेत किंवा सर्वच वाईट आहेत, असे नाही. शेवटी मतदारांनी ठरवायचे, की आपण कुणाला मतदान करायचे ते. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे उमेदवार निवडून न देता जे नागरिकांच्या हाकेला धावून जातील, प्रामाणिकपणे काम करतील त्यांनाच मतदान करावे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com