रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार वाऱ्यावर 

रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार वाऱ्यावर 

जळगाव : उपविभागात "एमआयडीसी'नंतर सर्वाधिक गुन्हे दाखल होणारे, संवेदनशील आणि व्हीव्हीआयपी रहिवास असलेले एकमेव रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना भूलथापा देत रवाना करायचे; अन्यथा दाखल गुन्ह्यांचा तपास स्वत:लाच करावा लागले, या भीतीने गंभीर गुन्ह्यांना अर्ज स्वरूपात बदलून घेण्याची "जग्लरी' सद्या सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या तपासाचे गंभीर गुन्हेही पोलिस शिपायांकडून करवून घेतले जात असल्याने एकेका कर्मचाऱ्याकडे गुन्हे तपासाचा ढीग साचू लागला आहे. "डीबी' कर्मचाऱ्यांना मात्र तपासातून सूट असल्याने उपलब्ध संख्येवरच याचा ताण पडत असल्याचे चित्र आहे. 

रामानंदनगर पोलिस ठाण्याची पाच वर्षांपूर्वी स्थापना झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप, राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम असे दोन्ही "झेड प्लस' सुरक्षा असलेल्या "व्हीआयपी'सह सर्व न्यायाधीश, जिल्हाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, मोठे उद्योजक, व्यापारी बिल्डर लॉबी आणि स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. हद्दीची आंतरिक सुरक्षा तातडीचे कॉल्स दिवस रात्रगस्त आणि दाखल गुन्ह्यांच्या तपासाचा ताण सर्वाधिक या पोलिस ठाण्यात आहे. परिणामी, या पोलिस ठाण्यात बदलून येण्यास कर्मचारी तयार नाही. गेल्या दोन बदली गॅझेटमध्ये या पोलिस ठाण्याला कर्मचारीच मिळाले नाहीत. परिणामी, आहे त्याच कर्मचाऱ्यांवर डबल ड्युट्यांसह तपासा-मागे तपास दिला जातोय. डीबी पथकातील कर्मचारी तपास घेण्यास तयार नाही. काहींना ठाणे अंमलदार म्हणून ड्यूटी नकोय, तर काहींना क्षमतेपेक्षा अधिक गुन्हे थोपवल्याने तपासच करायचा नाहीये. येथून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे आदेश 15 नोहेंबरला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बजावले होते. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी प्रभारींनी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना सोडण्यास नकार दिला आहे. कारण 12 नाईक-सहाय्यक फौजदार सोडून दिले तर पोलिस ठाण्यात कोणीच शिल्लक उरणार नाही. 

गुन्ह्याचे "पाणी' करणे 
पोलिस ठाण्यात 8 ठाणे अंमलदार आलटून पालटून 3 शिफ्टमध्ये ड्यूट्या बजावतात. त्यांच्याकडेच चोरी, घरफोड्या, विनयभंग, अपघात, आकस्मिक मृत्यू, अदखलपात्र गुन्हे, तक्रारी अर्ज, वरिष्ठांचे अर्ज अशी कामांची "फेरीस्त' लागलेली आहे. परिणामी, सोनसाखळी तोडण्यापासून ते घरफोडीपर्यंतच्या तक्रारी घेऊन आलेल्या तक्रारदाराला गोड बोलून रवाना करणे, कच्च्या नोंद घेऊन तुम्हाला फोन करून बोलावतो, असे सांगून पाठवणे किंवा मग गंभीर गुन्ह्यात अर्ज लिहून द्या, असे म्हणून भाग-05 मध्ये मोडणाऱ्या तक्रारी गडप गेल्या जातात. कर्मचाऱ्यांनी याला कोडवर्डही दिला आहे. तक्रारदाराला रवाना करणे म्हणजे विषय "पाणी' झाला असे संबोधले जाते. 

आज अखेर रामानंदचा गुन्हे आलेख असा 
दाखल गुन्हे... 
भाग- 5 : फौजदारी गुन्हे : 202 
एनसी : अदखलपात्र तक्रारी : 908 
भाग - 6 : कारवाईपात्र : 98 
हरविलेल्या व्यक्तीची तक्रार : 60 
आकस्मिक मृत्यू तपास : 53 

उपलब्ध मनुष्यबळ : 75 (हजर - 61 : गैरहजर- 8) 
अधिकारी : 1 (प्रभारी), दुय्यम- 4 (हजर-2) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com