"राशी- 659'वरील बंदी उठविली; "क्‍यूआर' कोडवरून ओळख 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

जळगाव ः गेल्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राज्यात "राशी 659' या कापसाच्या बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. राज्य शासनाकडून बंदी उठविण्यात आली असून, या बियाण्यांचे पाकीट खरे की बनावट आहे, याच्या ओळखीसाठी "क्‍यूआर कोड'ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबणार आहे. 

जळगाव ः गेल्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर राज्यात "राशी 659' या कापसाच्या बियाणे विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. राज्य शासनाकडून बंदी उठविण्यात आली असून, या बियाण्यांचे पाकीट खरे की बनावट आहे, याच्या ओळखीसाठी "क्‍यूआर कोड'ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबणार आहे. 
मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीला 25 मेनंतर सुरवात होणार असून, या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बियाणे मार्केटमध्ये कापसाच्या विविध वाणांच्या बियाण्यांची पाकिटे उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात सरासरी चार लाख 65 हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड होत असते. याकरिता लागणाऱ्या कापसाच्या 23 लाख 16 हजार पाकिटांची मागणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. यापैकी आजच्या स्थितीला 7 लाख 34 हजार 270 पाकिटांची उपलब्धता झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी बियाणे घेताना पक्‍की पावती, बियाण्यांचे नाव, उत्पादक कंपनीचा उल्लेख व लॉट नंबर लिहिलेली पावती घेण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी केले आहे. 
 
370 वाणांना विक्रीस परवानगी 
आतापर्यंत जीईएसी मान्यता असलेल्या मूळ उत्पादक कंपनीच्या 402 वाणांची गतवर्षी एकूण 624 वेगवेगळ्या नावाने विक्री करण्यात येत होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होऊन यात फसवणुकीची शक्‍यता होती. यामुळे यंदाच्या हंगामापासून जीईएसपीने मंजूर केलेल्या नावानेच विक्री करण्याचे धोरण शासनाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार राज्यात 42 कंपन्यांच्या 370 वाणांनाच विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात प्रामुख्याने राशी, निजीविडू, अंकुर, अजित, मोनसॅउो ब्रह्मा, ग्रीनगोल्ड, कावेरी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्‍त विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तर स्वदेशी 5 या नॉनबीटीचे 9 हजार 480 पाकीट उपलब्ध झाले आहेत. 

शेतकऱ्यांची टळणार फसवणूक 
राज्यात विक्रीस बंदी घालण्यात आलेल्या "राशी 659' या बीटी बियाण्यास 18 मेस विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देण्यासाठी कंपनीकडून "राशी 659' बियाण्याच्या पाकिटावर "क्‍यूआर कोड' लावण्यात आलेला आहे. पाकिटावरील हा कोड स्क्रॅच करून त्यावरील क्रमांक शेतकऱ्याने एसएमएस करावयाचा आहे. एसएमएस केलेल्या मोबाईल क्रमांकावर कंपनीकडून लागलीच रिप्लाय देऊन बियाणे खरे आहे की बनावट याबाबतच्या खात्रीचा संदेश पाठविण्यात येईल. म्हणजेच शेतकऱ्याची बियाण्यात होणारी फसवणूक टळणार आहे.

Web Title: marathi news jalgaon rashi cotton seeds