जामनेरमधून महाजन यांना निवडणुकीत पाडणारच : आमदार डॉ. पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जळगाव : आम्हाला सातत्याने दमबाजी केली जात आहे. मात्र, "ईडी' आणि "बेडी'चीही आम्हाला भीती नाही. पक्षकार्यकर्त्यांनी एक होऊन समर्थपणे लढा दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून भाजप नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा पराभव निश्‍चित करू. त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा विश्‍वास माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला. 

जळगाव : आम्हाला सातत्याने दमबाजी केली जात आहे. मात्र, "ईडी' आणि "बेडी'चीही आम्हाला भीती नाही. पक्षकार्यकर्त्यांनी एक होऊन समर्थपणे लढा दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून भाजप नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा पराभव निश्‍चित करू. त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा विश्‍वास माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला. 

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आज जिल्हा मेळावा झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, निरीक्षक करण खलाटे, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी आमदार संतोष चौधरी, संजय पवार, अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, योगेश देसले, मंगला पाटील, कल्पना पाटील, कल्पिता पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. पाटील म्हणाले, की मंत्री गिरीश महाजन सातत्याने दमबाजी करीत असतात. आम्हाला "ईडी' आणि "बेडी'ची फिकीर नाही. यावेळी जामनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभूत करणार आहोत. हे शक्‍यही आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढा दिला तर त्यांना निश्‍चितच पराभूत करू शकतो. मात्र, गिरीश महाजन यांच्या खेळीकडेही लक्ष दिले पाहिजे. ते मतदारसंघात कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना "मॅनेज' करून आपल्याविरुद्ध कच्चा उमेदवार देतात. गेल्या वेळीही त्यांनी हेच केले होते. मात्र, यावेळी तसे घडू दिले जाणार नाही. महाजन यांच्याविरोधात तगडा उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. यावेळी जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार निवडून आणूच, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

भगवा झेंडाही लावा 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्यासोबत आता कार्यकर्त्यांनी गाडीला भगवा झेंडाही लावावा, असे आवाहन आमदार डॉ. पाटील यांनी केले. ते म्हणाले, की भगवा झेंडा हा कुणाची मक्तेदारी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा झेंडा आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता गाडीवर तसेच कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्यासोबत भगवा झेंडाही लावावा. 

जिल्ह्यात "राष्ट्रवादी'चे सहा आमदार : गुजराथी 
यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष गुजराथी म्हणाले, की राज्यात अनेक नेते शरद पवारांना सोडून गेले आहेत. जाणारे नेते म्हणतात, आमच्या हृदयात शरद पवार आहेत. मग, तुम्ही सोडून जाताच कशाला? विकासासाठी आम्ही पक्ष सोडून जात आहोत, असे ते सांगत आहेत. पण, कुणाच्या विकासासाठी? केवळ स्वार्थासाठीच ते पक्षबदल करीत आहेत. पक्षबदल केलेल्या एकालाही भाजप मंत्रिपद देणार नाही. गेले ते गेले, कार्यकर्त्यांनी आता जोमाने कार्य करण्याची गरज आहे. त्यातून पक्षाची ताकद वाढवून विधानसभेत निश्‍चित यश मिळणार आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यातून सर्वांत जास्त सहा आमदार निवडून आणणार आहोत. 
यावेळी अनिल भाईदास पाटील, संजय पवार, पक्षनिरीक्षक करण खलाटे, वसंतराव मोरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. 

अमळनेरमधून अनिल भाईदास पाटील उमेदवार 
पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील म्हणाले, की अमळनेर मतदारसंघातून यावेळी अनिल भाईदास पाटील हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत, अशी मी ग्वाही देतो. तुम्ही जर उमेदवार नसाल, तर मीही उमेदवारी करणार नाही. 

मी उमेदवार नाही : ऍड. रवींद्र पाटील 
पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील म्हणाले, की मुक्ताईनगर संघातून यावेळी मी उमेवारी करणार नाही. पवार साहेबांशी माझे बोलणे झाले आहे. या मतदारसंघात पक्षातर्फे पाच इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून त्यांची उमेदवारी निश्‍चित करावी. त्यांच्यामागे आपण सर्व ताकद उभी करणार आहोत. 

अविनाश पवार यांना मदत! 
जिल्हा बॅंकेचे संचालक तथा पक्षाचे पदाधिकारी संजय पवार यांनी चांदसर येथील पक्षाचे कार्यकर्ते अविनाश पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी आमदार डॉ. पाटील व माजी खासदार वसंतराव मोरे यांनी मदत जाहीर केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rashtrawadi mla dr patil