राज्यात "राष्ट्रवादी' आणि राज ठाकरेंचंच नाणं चालत! : सुप्रिया सुळे 

राज्यात "राष्ट्रवादी' आणि राज ठाकरेंचंच नाणं चालत! : सुप्रिया सुळे 

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून लोक जात आहेत, तरीही आमच्या पक्षाबाबतच विचारणा केली जात आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचा आज एकही आमदार नाही, तरीही त्यांच्या "इडी' चौकशीबाबत तब्बल 72 तास मीडियावर कव्हरेज चाललं. त्यामुळे हे आता दिसून आलं आहे की कितीही पडझड झाली तरी नाणं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राज ठाकरेंचंच चालतं. याच कारण म्हणजे आमच्याबाबत जनतेत विश्‍वास आहे. भाजपवाल्यांना मात्र प्रसिद्धीसाठी पूरग्रस्त भागात सेल्फी काढण्यासाठी जावं लागतं, हे त्यांचं दुर्दैव आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. जळगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. 
संवाद यात्रेनिमित्त आज त्या जळगावात आल्या होत्या. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, मंत्री मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, गफ्फार मलिक, जिल्हा महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, महिला आघाडीच्या मंगला पाटील, कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या. पक्षातून आज अनेक लोक जात आहेत, मात्र कितीही पडझड झाली तरी कार्यकर्त्यांनी डगमगून जाऊ नये. आपण लढणारे आहोत, कॉपी करणारे नाही. आपले कायकर्ते घेऊन ते पास होत आहेत. त्या पास होण्याला काहीही अर्थ नाही. आपण कॉपी करू नये. पडझडीच्या काळात कार्यकर्त्यांनी डगमगून जाऊ नये, आपले नेते शरद पवार यांच्यावर विश्‍वास ठेवून संघर्ष करावा. अशक्‍य गोष्ट शक्‍य करण्याची ताकद आपल्यात आहे, ती निश्‍चित शक्‍य होईल. 

भाजप बळकट, तरी बाहेरचे कशासाठी? 
भारतीय जनता पक्षावर टीका करताना त्या म्हणाल्या, भाजपचे नेते म्हणतात आमच्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आमची संघटना बळकट आहे. भाजप जर खरोखरच बळकट असेल तर मग इतर पक्षातील लोक तुम्ही का फोडत आहात.? तुमच्याच पक्षातील लोकांना तुम्ही संधी का देत नाहीत. आयत्या बिळावर नागोबा तुम्ही का बसविता आहात? असा सवालही त्यांनी केला. 

जनतेचा विश्‍वास कायम 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक फोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगून त्या म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची भीती वाटत आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे लोक फोडण्याच्या मागे लागलेले आहेत. आमची पडझड होत असली तरीही आमच्या पक्षाबद्दल जनतेतून विचारणा होत आहे. प्रसिद्धी माध्यमातूनही चर्चा होत आहे. राज ठाकरेंबाबतही तसेच आहे. आज त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही, मात्र "इडी' चौकशीला जात असताना मीडियाने तब्बल 72 तास त्यांचे कव्हरेज दिले. कारण जनतेत त्यांच्याबाबत विश्‍वास आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व राज ठाकरे हे चालणारं नाण आहे. भाजपचे मात्र तसे नाही त्यांच्या पक्षाचे लोक सांगली, कोल्हापूर भागात पूरग्रस्तांच्या मदतीला जाण्याच्या नावाखाली सेल्फी काढून प्रसिद्धी मिळवितात. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com