राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग : संग्राम कोते-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

जळगाव : राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून विरोधकांना धाक दाखविण्यासाठी वापर केला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपोटील यांनी केला आहे. जळगाव येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. 

जळगाव : राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग होत असून विरोधकांना धाक दाखविण्यासाठी वापर केला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपोटील यांनी केला आहे. जळगाव येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. 
लेवा भवनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड. रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागूल, किसान सेलचे सोपान पाटील, महानगर महिला अध्यक्षा नीला चौधरी, माजी महानगर अध्यक्ष परेश कोल्हे, युवकचे माजी अध्यक्ष रमेश पाटील, योगेश देसले, राजेश पाटील, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सविता बोरसे, रोहन सोनवणे यावेळी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना संग्राम कोतेपाटील म्हणाले, की सत्तेतील सरकारला सत्तेचा मस्ती आली आहे. सत्तेचा दुरुपयोग वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये दररोज खुनाच्या घटना होत आहेत. त्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर सरकार बोलत नाही, मात्र सरकारातील मंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन फेक योजनांच्या घोषणा करीत आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील युवकांनी युवकांनी जागरूकपणे काम करण्याची गरज आहे. ज्या पक्षामध्ये युवक आहेत, त्याच पक्षाला राजकीय भवितव्य आहे. राष्ट्रवादीची युवक आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक बूथवर युवकांची निवड करण्यात येणार आहे. युवकांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. 

मंत्र्याचे नाव जाहीर करावे : आमदार पाटील 
पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील म्हणाले, की भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देखील त्रास दिलेला आहे. खडसे यांनीच आपल्या पक्षातील सरकारमधील एक मंत्री अंजली दमानिया यांच्या आडून आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले आहे. खडसे यांनी त्या मंत्र्यांचे नाव जाहीर करावे असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले आहे. रावेर येथील केळीच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात किसान सेलचे सोपान पाटील यांना मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धक्काबुकी झाल्याच्या घटनेचा डॉ. सतीश पाटील यांनी निषेध केला. 

जळगावात राष्ट्रवादीची ताकद : गुजराथी 
राज्याचे माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी म्हणाले, की जळगाव शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद आहे. आमच्या सहकार्याशिवाय कोणत्याही पक्षाला महापौर करता येणार नाही. आगामी निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत. या निवडणुकीत युवकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

ग्रामीण भागात काम करा : देवकर 
माजी मंत्री गुलाबराव देवकर यावेळी बोलताना म्हणाले, की युवकांनी संघटन 
वाढविले पाहिजे, युवकांनी केवळ लेटरपॅड पुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागात जाऊन कार्य केले पाहिजे. जनतेत जाऊन पक्षाची भूमिका समजावून सांगितली पाहिजे. 
यावेळी ऍड. रवींद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागूल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon rashtrvadi congress sngram patil