पुर्नवैभवाचे स्वप्न सत्यात आणण्याचे आव्हान! 

पुर्नवैभवाचे स्वप्न सत्यात आणण्याचे आव्हान! 

"राष्ट्रवादी लय भारी... हे शीर्षक गीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. मात्र, प्रत्यक्षात 2014 पासून त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता "राष्ट्रवादी लय हारी..!' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभेतील आणि आता लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नेते पक्ष सोडून जात आहेत. धुळे, जळगाव जिल्ह्यात फार मोठी हानी झालेली नाही; परंतु पक्षासमोर विधानसभेत यश मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. एकेकाळी खानदेशात नंदुरबारसह धुळे व जळगाव जिल्ह्यात पक्षाला चांगले वैभव होते. आज मात्र एरंडोल मतदार संघात एकमेव आमदार वगळता पक्षाचे कुठे फारसे स्थान नाही. पक्षाची राज्यात पडझड होत असताना खानदेशात असलेले पक्षाचे पुर्नवैभव आणण्याचे स्वप्न नेते पाहत आहेत. मात्र, ते सत्यात उतरणार काय? याचा निकाल विधानसभेच्या मतदानात जनताच देईल. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातून नागपूर विधानसभेवर पायी शेतकरी दिंडी काढली होती. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचे खानदेशात गारूड निर्माण झाले. सहकार क्षेत्राशी पक्षाची नाळ असल्यामुळे त्यावेळी या क्षेत्राशी निगडित असलेले खानदेशातील अनेक नेते त्यांच्या नेतृत्वात पक्षात आले. एस. कॉंग्रेस ते थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसपर्यंत अनेक नेते त्यांच्यासमवेत राहिले. त्याच बळावर खानदेशात राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही बळ धरले. 
खानदेशात कॉंग्रेसलाही मागे टाकत राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष झाला होता. अगदी जळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून पक्षाने खासदारकीवरही आपला शिक्कामोर्तब केला होता. सन 2004 च्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार येथे विजयकुमार गावित हे आमदार झाले. शहाद्यात हेमंत देशमुख, तर धुळे येथे राजवर्धन कदमबांडे आमदार झाले. जळगाव जिल्ह्यातही पारोळ्यातून डॉ. सतीश पाटील, भुसावळ येथून संतोष चौधरी आमदार झाले. याशिवाय, चोपडा, मुक्ताईनगर आणि पाचोरा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत होऊन क्रमांक दोनवर राहिले. मात्र, खानदेशात राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगलाच दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर 2008 च्या विधानसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठी मुसंडी मारत नंदुरबार, चोपडा, भुसावळ, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, पाचोरा मतदारसंघात यश मिळविले होते. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष होता. मात्र, सन 2014 च्या निवडणुकीत पक्षाला मोठा झटका बसला. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पक्षाची धूळधाण झाली तर जळगाव जिल्ह्यातही एरंडोल-पारोळा मतदार संघाची जागा कशीबशी बचावली आणि त्यावरच पक्षाचे आमदारकीचे अस्तित्व जिल्ह्यात शिल्लक राहिले. 
तब्बल पंधरा वर्षांपासून राज्यात असलेली सत्ता गेल्यानंतर खानदेशात पक्षात काही जोर शिल्लक असलेला दिसला नाही. जळगाव महापालिका निवडणुकीत पक्षाला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. तीच परिस्थिती धुळे महापालिकेत झाली. लोकसभेत जळगाव लोकसभा मतदारसंघातही पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. नंदुरबार मतदारसंघात विजयकुमार गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणचे राष्ट्रवादी कॉंग्रेस "घड्याळ'ही दिसेनासे झाले. धुळ्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे पक्षाच्या अस्तित्वासाठी निकराने लढा देत आहेत. जळगाव जिल्ह्यातही आता पक्षाची परिस्थिती कठीण आहे. राज्यभरात पक्षाचे नेते सोडून जात असताना खानदेशातील पक्षाचे नेते अद्यापही सोबत आहेत. हीच मोठी जमेची बाजू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हेच नेते आता कार्यकर्त्यांत जान फुंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षाचे एकेकाळचे असलेले यशाचे पुर्नवैभव या विधानसभा निवडणुकीत सत्यात आणले जाईल, असा विश्‍वास या नेत्यांना आहे. मात्र, त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे, हे मात्र निश्‍चित. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com