धान्य वितरणासाठी गावांमध्ये दक्षता समिती कार्यान्वित करा -जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

धान्य वितरण सुटसुटीत व्हावे यासाठी गावातील दक्षता समिती कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. 

जळगाव ः  "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर कोणीही धान्यापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. धान्य वितरण सुटसुटीत व्हावे यासाठी गावातील दक्षता समिती कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्ह्यातील तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. 

 ओली पार्टी ः "रम', "रमीत' रंगली पोलिस, वाळू माफीयांची मैफील 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या "लॉकडाउन'च्या काळात हाताला काम नसल्याने अनेकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने स्वस्त धान्य तसेच तीन महिने मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्य वितरण करण्यात येत असून, ज्यांच्याकडे शिधापत्रिका असल्या, तरी त्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे धान्य मिळत नाही. अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे गोंधळ वाढू लागला. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात आता पुन्हा धान्य वितरणाबाबत जिल्हा पुरवठा विभागातर्फे विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात गावातील दक्षता समिती कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रत्येक स्वस्त दान्य दुकानातील 50 ते 60 कुटुंबे नेमून द्यावीत. त्यांना या कुटुंबांचे पालकत्व सोपवावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. हे शिक्षक धान्य वितरणाबाबत जनजागृती करणार असून, योग्य माहिती वेळोवेळी देतील. शहरी भागातही याच धर्तीवर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

धुळे ब्रेकिंग ः जिल्ह्यात आणखी तीन "कोरोना' पॉझिटीव्ह, साक्री, शिरपूरला जखडले 

केशरी शिधापत्रिकाधारकांच्या धान्य वितरणाबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. यात मेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या नियमित धान्यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांच्याही धान्याचे चलन प्राधान्याने 25 एप्रिलपर्यंत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडिंग झाले नसेल, तरी त्यांना त्यांचे शिधापत्रिका तपासून अन्नधान्य देण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धान्य वितरणाबाबत विविध सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ration distribution committee form