लोकसभेच्या रावेर मतदारसंघासाठी "कॉंग्रेस'चा हट्ट! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

जळगाव : लोकसभा निवडणुकींतर्गत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या सात ते आठ जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यात रावेरच्या जागेसाठी यावेळी कॉंग्रेसने हट्ट धरला आहे. त्यामुळे ही जागा अंतिम बोलणीत कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

जळगाव : लोकसभा निवडणुकींतर्गत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या सात ते आठ जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यात रावेरच्या जागेसाठी यावेळी कॉंग्रेसने हट्ट धरला आहे. त्यामुळे ही जागा अंतिम बोलणीत कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 
जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर हे मतदारसंघ आहेत. सद्यःस्थितीत दोन्ही जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. लोकसभा निवडणूक भाजप व शिवसेनेने युती करून लढल्याने युतीच्या जागा वाटपात दोन्ही मतदारसंघ भाजपकडेच आले. यावेळी मात्र लोकसभा निवडणुकीतील ही युती कायम राहील की नाही, याबाबत कोणतीही निश्‍चिती नाही. मात्र आता शिवसेनेने दोन्ही जागांसाठी तयारी केली आहे. परंतु सध्या वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षांच्या युतीबाबत कोणतीही चर्चा होत नसल्याने सध्या तरी लोकसभेबाबत युतीत शांतता आहे. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची तयारी सुरू असून, राज्यातील जागा वाटपाबाबत त्यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चाही सुरू आहेत. राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघांतील जागा वाटपाबाबत एकमत झाले आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील रावेरसह आठ जागांबाबत अद्याप दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. 
जिल्ह्यातील जळगाव व रावेर हे मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहेत. गेल्या दोन पंचवार्षिकपासून तेच लढवत आहेत. परंतु त्यांना यश आलेले नाही. यावेळी कॉंग्रेसने रावेर मतदारसंघासाठी आग्रह धरल्याचे सांगितले जाते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच नेत्यांनी रावेरसाठी प्रयत्न चालविला आहे. जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा फैजपूर येथून सुरू करण्यात आला, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात फैजपूरला कॉंग्रेसचे अधिवेशन झाले. या ठिकाणी कॉंग्रेसला ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामुळे या ठिकाणाहून कॉंग्रेसचा खासदार निवडून आला पाहिजे, असे मत व्यक्त करून आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कॉंग्रेसकडेच घेऊ, अशी ग्वाही दिली. त्यानुसार त्यांनीही जागा वाटपात रावेर कॉंग्रेससाठीच मागितले आहे. 
रावेर मतदारसंघातील रावेर, यावल या विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसची स्थिती चांगली आहे. याशिवाय बोदवड, मुक्ताईनगर या भागांतही कॉंग्रेस व राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्रात माजी नगराध्यक्ष संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे अजूनही या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्याचा फायदा कॉंग्रेसला होईल. जामनेर मतदारसंघात कॉंग्रेस कमजोर आहे, तेथे पक्षाला अधिक परिश्रम घ्यावे लागेल. याशिवाय कॉंग्रेसतर्फे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारी तयार आहे. त्यांनी त्यासाठी मतदारसंघाची बांधणीही केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही असून, ही जागा कॉंग्रेसलाच सोडली जाण्याची शक्‍यता व्यक्त होत असून, त्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

लोकसभेची रावेरची जागा दोन निवडणुका वगळल्यास परंपरागत कॉंग्रेसकडेच राहिली आहे. आमच्याकडे उमेदवारही आहे. त्यामुळे कॉंग्रेस या मतदारसंघासाठी आग्रही आहे. दोन्ही पक्षांमधील जागा वाटपात आपल्यालाच ही जागा मिळेल, याची खात्री आहे. 
- ऍड. संदीप पाटील जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस.
 
 

Web Title: marathi news jalgaon raver loksabha cangress