Loksabha 2019 : राहुल, प्रियंका गांधींच्या सभेने "रावेर'चे चित्र बदलणार? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

जळगाव: जिल्ह्यातील रावेर मतदार संघात कॉंग्रेसने यशासाठी जोरदार कंबर कसली आहे. पक्षाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाद्रा यांची जाहीर सभा या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात चित्र बदलणार काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

जळगाव: जिल्ह्यातील रावेर मतदार संघात कॉंग्रेसने यशासाठी जोरदार कंबर कसली आहे. पक्षाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाद्रा यांची जाहीर सभा या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात चित्र बदलणार काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात "हाय होल्टेज' लढत आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात सामना आहे. हा मतदारसंघ गेल्या वीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. अगोदर जळगाव आणि आता रावेर झालेल्या मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे. वैशिष्ट म्हणजे या मतदार संघात भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व आहे. या शिवाय भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर मतदारसंघही याच लोकसभा क्षेत्रात आहे. शिवाय भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या मतदार संघात दुसऱ्यांदा उमेदवार आहेत. खासदार म्हणून त्यांनी या मतदारसंघात चांगलीच छाप पाडली आहे. 
 
आघाडीतर्फे तुल्यबळ उमेदवार 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे या मतदारसंघात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लेवापाटील बहुल असलेल्या या मतदारसंघात दोन्ही उमेदवार याच समाजाचे आहेत. कॉंग्रेसने या मतदारसंघाच्या विजयासाठी जोरदार कंबर कसली आहे. कॉंग्रेसतर्फे उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या मतदारसंघात सभा घेणार आहेत. 

गांधींचा करिष्मा चालणार का? 
राहुल गांधी यांची शुक्रवारी (ता. 12) भुसावळ येथे सभा आहे. तर प्रियंका गांधी-वॉड्रा यांची गुरुवारी (ता. 18) फैजपूर येथे जाहीर सभा होणार आहे. जळगाव जिल्ह्यात राहुल आणि प्रियंका दोन्ही पहिल्यांदाच येत आहेत. त्यांच्या सभेमुळे रावेर लोकसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र बदलणार काय? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. आता राहुल गांधी व प्रियंका गांधीही जिल्ह्यात सभेसाठी येत असल्याने दोघांचाही करिष्मा रावेर मतदारसंघासोबतच जळगाव लोकसभा मतदार संघातही चालणार काय? याबाबतच आता उत्सुकता आहे.

Web Title: marathi news jalgaon raver loksabha election rahhul priyamka gandhi