Loksabha 2019 : रावेरमध्ये आता "हाय होल्टेज' लढत 

रविवार, 31 मार्च 2019

जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यभरात "हाय होल्टेज' ठरणार आहे. 

जळगाव ः जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार आहे. यावेळी मतदारसंघातून समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील या दोन तुल्यबळ उमेदवारांत लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यभरात "हाय होल्टेज' ठरणार आहे. 

मतदारसंघात भाजप व शिवसेना युती आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे उमेदवार जाहीर करण्यापासूनच प्रतीक्षा होती. भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याने खडसेंच्या बाबतीत अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस युतीतही जागा वाटपापासून तर थेट उमेदवारीपर्यंत घोळ झाला. अखेर कोणत्याही अटीशिवाय ही जागा राष्ट्रवादीने कॉंग्रेसला सोडली अन्‌ उमेदवारीचा तिढा सुटला. कॉंग्रेसतर्फे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक आता लेवा पाटील मतदार आणि पक्षीय पातळीवरही दोन तुल्यबळ उमेदवारांची लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

खासदारांचा दांडगा जनसंपर्क 
युतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांची दुसरी टर्म आहे. कोथळीच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते थेट खासदारकीच्या कामाचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या शिवाय खासदार म्हणून त्यांनी दिल्लीतील संसदेत आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. उत्कृष्ट संसद सदस्यांतही त्यांची गणना झाली. या शिवाय मतदारसंघात संपर्क ठेवण्याचे कामही त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे त्यांच्या मतदारसंघातील संपर्काबाबत कौतुक केले आहे. या शिवाय थेट वाड्या वस्त्यांपर्यंत भेट देवून त्या ठिकाणी वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले, ही त्यांची जमेची बाजू आहेच. तसेच सासरे एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मतदारसंघात उभी केलेली कार्यकर्त्याची फळी याचा मोठा लाभ त्यांना होणार आहे. 

डॉ. पाटील कुशल राजकारणी 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे कुशल राजकारणी आहेत. एकवेळ अल्पकाळ खासदारपद मिळाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाचे सरकार असताना मेडिकल कॉलेज मंजूर करून आणले होते, ही मोठी बाब आहे. शिवाय त्याच कॉलेजच्या माध्यमातून ते या परिसरात रुग्णांना सेवा देत आहेत. ही त्यांच्या सामाजिक कार्याची जमेची बाजू आहे. याशिवाय त्यांनी विविध संस्थांची उभारणी केली आहे. याच मतदारसंघात त्यांना अगोदर तीन वेळा पराभव पत्करावा लागला असला, तरी त्या-त्या वेळची राजकीय समीकरणेही त्याला जबाबदार होती. यावेळी मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस संयुक्तपणे त्यांच्या पाठीशी आहे. शिवाय जातीय समीकरणाच्या गणितातही लेवा पाटीदार समाजाची विरोधी उमेदवाराच्या तोडीची मते ते घेऊ शकतात. या शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मराठा बहुल क्षेत्रातील प्रभाव व कॉंग्रेसचा मुस्लीम मतदारांवरचा प्रभाव ही गणितेही त्यांच्या बाजूने झुकणारी दिसत आहेत. त्यामुळे या मतदार संघातील लढत ही तुल्यबळ ठरण्याचे चित्र दिसत आहे. शेवटी युद्ध आणि निवडणुकीत निकाल लागेपर्यंत कोणीही काहीच सांगू शकत नाही, हेच सत्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon raver loksabha hai holtage ladhat