रणांगणाचा शंखनाद; शोध लढणाऱ्यांचाच! 

रणांगणाचा शंखनाद; शोध लढणाऱ्यांचाच! 

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे. 

भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे. मात्र, गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून त्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर चौकशी होऊन ते निर्दोष असल्याचा त्यांचा दावा आहे; परंतु पक्षातर्फे त्यांची घोषणा केली जात नाही, त्यामुळे होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात त्यांची नाराजी आहे. त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या मतदार संघातील खासदार आहेत. त्यांची लोकसभेतील आणि मतदार संघातील कामगिरी चांगली आहे. तरीही त्यांची पक्षातर्फे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात नाही. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार की दुसरा उमेदवार देणार, असे अनिश्‍चितचे पक्षात सावट आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीतही जोरात तयारी नाही. कॉंग्रेसकडे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उमेदवार आहेत; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदार संघ सोडण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही, तसेच उमेदवारीच्या घोषणेबाबतही "वेट ऍड वॉच'ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सद्या तरी रणांगणात लढाई कोणात होणार याचीच प्रतीक्षा आहे. 
गेल्या निवडणुकीत युतीतर्फे रक्षा खडसे तर विरोधात कॉंग्रेस आघाडी अंतर्गत राष्ट्रवादीतर्फे मनीष जैन उमेदवार होते. जातीय समीकरणात आधारित असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जैन यांना दिलेली उमेदवारी चर्चेत होती. त्यातच भाजपला मोदी लाटेचाही फायदा आणि खडसे यांचे वर्चस्व यामुळे या मतदार संघातून रक्षा खडसे मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाल्या. 
 
भाजपत अंतर्गत धुसफूस 
भाजप व शिवसेना युतीत ही जागा भाजपकडे आहे. मित्रपक्ष शिवसेनेने या जागेची मागणी केली होती. मात्र या मतदार संघानिहाय विधानसभेची रचना पाहता केवळ एकाच मतदार संघात पक्षाचा आमदार आहे. उर्वरित चार मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ताकदीच भाजप उजवा ठरत आहे. मात्र, भाजपत अंतर्गत धुसफूस मोठी आहे. विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील गटबाजी पूर्ण राज्याला माहीत आहे. यातूनच उमेदवारीची स्पर्धा असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांचे नावही आता चर्चेत आहे. मात्र खडसे यांची साथ या मतदार संघात महत्त्वाची असल्याने रक्षा खडसे यांची उमेदवारी नाकारण्याची जोखीम भाजप घेण्याची शक्‍यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता भाजपतर्फे या मतदार संघात उमेदवार कोण असणार याकडेच लक्ष्य आहे. 
 
"राष्ट्रवादी'ही प्रतीक्षेतच 
भाजप-सेना युतीचा उमेदवार भाजपने निश्‍तिच केला नसला तरी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसही या मतदार संघात फारशी जोमात असल्याचे चित्र दिसत नाही. कॉंग्रेसने या मतदार संघाची मागणी केली आहे. डॉ. उल्हास पाटील उमेदवार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हा मतदार संघ लढण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्यांच्याकडे दृष्टिक्षेपात उमेदवार नसला तरी ऐनवेळेस उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे पक्षनेतृत्वाचेच म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपचे नेते एकनाथराव खडसे पक्षावर नाराज आहेत. भाजपच्या उमेदवार घोषणेत उलटफेर झाल्यास खडसे काय भूमिका घेणार? याचीच प्रतीक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्याच आधारावर राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भाजपकडून काहीही उलटफेर झाले नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अरूणभाई गुजराथी किंवा संतोष चौधरी यांना उमेदवारी घोषित होण्याची शक्‍यता आहे. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची कॉंग्रेसतर्फे तयारी आहेच. मात्र सद्या तरी या मतदार संघाच्या मैदानात कोणत्याच पक्षाचा उमेदवार दिसत नसल्याने मतदार व कार्यकर्त्यांचेही लक्षही उमेदवार जाहीर होण्याकडेच आहे. 
 
निवडणुकीतील महत्त्वाचे प्रश्‍न 
जामनेर येथे घोषित कॉटन हब उभारणी 
केळी निर्यातीसाठी रेल्वे वाहतूक व्यवस्था 
तापी नदीवरील जलपुर्नभरण योजना कार्यान्वित होणे 
चौपदरी महामार्ग पूर्ण होण्याची प्रतीक्षा 
 
2014 च्या निवडणुकीत मिळालेली मते 
रक्षा खडसे (भाजप)- 6,05,452 
मनीष जैन (राष्ट्रवादी)- 2,87,384 
 
2014 विधानसभा निहाय मते 
मतदार संघ रक्षा खडसे मनीष जैन 
चोपडा 1,18,937 40,314 
रावेर 10,1700 54,760 
भुसावळ 92,716 37,008 
जामनेर 98,685 59,092 
मुक्ताईनगर 98,554 65,894 
मलकापूर 95,372 40,223 
 
एकूण मते 6,05452 2,87,384 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com