Loksabha 2019 : विकासासाठी पाच वर्षांचा "मास्टर प्लॅन' तयार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी मार्गी लावायची, हे शिकून घेतले. केंद्र सरकारशी निगडित सुविधा, प्रकल्पांची 50 टक्के कामे आजमितीस पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पुढील पाच वर्षांत होतील, असा दावा भाजप-शिवसेना महायुतीच्या रावेरमधील उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आपली भूमिका मांडताना केला. 

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी मार्गी लावायची, हे शिकून घेतले. केंद्र सरकारशी निगडित सुविधा, प्रकल्पांची 50 टक्के कामे आजमितीस पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पुढील पाच वर्षांत होतील, असा दावा भाजप-शिवसेना महायुतीच्या रावेरमधील उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी आपली भूमिका मांडताना केला. 

प्रश्‍न ः मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काय प्रयत्न आहेत? 
खासदार खडसे ः बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी भुसावळ येथे रेल्वे कोच फॅक्‍टरी सुरू होण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे पत्रव्यवहार झाला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा प्रकल्प 100 टक्के आपल्याच भागात सुरू व्हावा, यासाठी माझे प्रयत्न आहेत. 

प्रश्‍न ः मतदारसंघ विकासाचा "मास्टर प्लॅन' काय आहे? 
खासदार खडसे ः मतदारसंघात केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत रस्ते, सिंचनाची कामे मार्गी लागली आहेत. काही कामे झाली आहेत, तर काही सुरू आहेत. ग्रामपंचायतींचा कारभार ऑनलाइन करण्याचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. दुर्गम आदिवासी भागातही सौरऊर्जा, उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. सीएसआर निधी आणून अपंग बांधवांची शिबिरे घेतली. बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले. मतदारसंघाच्या विकासासाठी सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगारनिर्मिती आदींच्या समावेशाचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. मेगा रिचार्ज हा माझा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. यामुळे चोपडा, रावेर, यावल या भागात पाच लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येईल. अनेर नदीवर 3 ते 4 बंधारे बांधण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. यामुळे चोपड्यातील पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. 

प्रश्‍न ः रेल्वे, विमानसेवेबाबत काय नियोजन आहे? 
खासदार खडसे ः रेल्वेची चौथी लाइन सुरू झाल्यावर भुसावळ ते पुणे रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पुढील महिन्यात जळगाव ते मुंबई विमानसेवेला सुरवात होत असून, पुण्यासाठी ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जळगाव जिल्ह्यातून पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना नवीन रेल्वे गाडी व विमानसेवेचा फायदा मिळेल. रेल्वे सेवेच्या संदर्भात केलेली ठोस कामे आज जनतेसमोर आहेत. या कामांच्या बळावर मतदारराजा पुन्हा मलाच संसदेत पाठवतील, यात मला शंका नाही. 

प्रश्‍न ः मतदारसंघात फिरताना काय जाणवते? 
खासदार खडसे ः मतदारसंघात ग्रामीण भाग जास्त आहे. जनतेचा पाठिंबा असल्याचे दिसते आहे. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खासदार म्हणून माझी भूमिका व कार्यक्षेत्र वेगळे आहे. मात्र, माझ्यावरील विश्‍वास, जनतेप्रतीचे माझे उत्तरदायित्व बघून जनता ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्‍न माझ्याकडे मांडते. अशावेळी ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, आमदार व खासदार यांची जबाबदारी काय असते, हे जनतेला सांगावे लागते. केंद्र सरकारच्या विमा योजना, पेन्शन योजना, वैद्यकीय योजना याबाबत महिला वर्गात जागरूकता वाढली असून, त्यांना आर्थिक स्थिरता मिळाली आहे. 

प्रश्‍न ः विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर द्याल? 
खासदार खडसे ः सत्ताधारी पक्षावर उलटसुलट आरोप करणे हे राजकारणात विरोधी पक्षाचे कामच आहे. पण, मी बाबांच्या (एकनाथराव खडसे) यांच्या शिकवणीत तयार झालेली कार्यकर्ती आहे. त्यांनी आयुष्यभर जनतेची सेवा करीत जिल्हा आणि खानदेशचा विकास साधला. मला पाच वर्षे खासदार असताना त्यांनी विकासाचीच कास धरण्याची शिकवण दिली. निवडून आल्यानंतर पाच वर्षे मतदारांचे तोंडही न पाहणारे खासदारही आहेत. पण बाबांनी मला सतत जनतेत राहायचे, त्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवायचे बाळकडू या पाच वर्षांत दिले. त्यामुळे माझे केवळ विकासावर लक्ष केंद्रित असून, मी कुणावर आरोप करीत नाही किंवा कुणाच्या आरोपांना उत्तर देत बसत नाही. माझ्या कामांमुळे जनतेचा माझ्यावर विश्‍वास आहे, हेच मी या घडीला आत्मविश्‍वासाने सांगू शकते. 
 

Web Title: marathi news jalgaon raver loksabha raksha khadse master plan