Loksabha 2019 : रावेरमध्ये भाजप विरुद्ध कॉंग्रेस; "राष्ट्रवादी'चा लढाईचाच तिढा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

जळगाव : जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्याविरुद्ध विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नव्हे; तर अद्याप जागेची निश्‍चिती होत नाही. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसने त्याची मागणी केली आहे; परंतु अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. 

जळगाव : जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांच्याविरुद्ध विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार नव्हे; तर अद्याप जागेची निश्‍चिती होत नाही. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसने त्याची मागणी केली आहे; परंतु अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. 
भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ रावेर मतदारसंघात आहे. याच मतदारसंघातून त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत. मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर भोसरी जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीला खडसे सामोरे गेले. यातून ते निर्दोष सुटल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, शासनातर्फे अद्याप त्याची घोषणा करण्यात आलेली नाही. याबाबतचे निदोषत्व घोषित करून पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी त्यांची व पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे त्यांनी पक्षावर जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना भाजपतर्फे पुन्हा उमेदवारी दिली जाणार काय? याबाबत संपूर्ण राज्यात उत्सुकता होती. त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय तर्कवितर्क लढविले जात होते. 
रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली, तर एकनाथराव खडसे पक्ष सोडून कॉंग्रेस व किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे लोकसभेच्या रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या जागेचा उमेदवार घोषित केला जात नाही, असेही सांगण्यात येत होते. आता भाजपने रक्षा खडसे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर जाली आहे. त्यामुळे सर्वच तर्कवितर्कांवर पडदा पडला आहे. मात्र, आता रक्षा खडसे यांच्याविरुद्ध उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा की कॉंग्रेसचा असणार, यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कॉंग्रेसतर्फे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसने या जागेची मागणी केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत अधिकृत भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेही या जागेसाठी भक्कम असा उमेदवार दृष्टिपथात नाही. त्यामुळे रावेर मतदारसंघ कॉंग्रेस की राष्ट्रवादी कॉंग्रेस लढणार, याचीच निश्‍चिती होत नसल्यामुळे उमेदवार कोण? हे तर अद्याप दूरच आहे. 
 
रावेरच्या जागेबाबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप बोलणी सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. 
- ऍड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 
 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसकडे उमेदवार असल्यामुळे आम्ही या जागेची मागणी अद्याप कायम ठेवली आहे. लवकरच श्रेष्ठींचा निर्णय होईल. 
- ऍड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 
 

Web Title: marathi news jalgaon raver loksabha raksha khadse rashtrwadi