जोगलखोरीतला शिक्षक बनला विद्यार्थ्यांचा पालक! 

dipak patil
dipak patil

जळगाव ः भिल्ल- आदिवासी समाजाच्या अवघ्या पाचशे लोकवस्तीचे जोगलखोरी (ता. भुसावळ) गाव. उपेक्षित समाज म्हणून मुलांमध्ये शिक्षणाबाबत आवड नाही.. अशा प्रतिकूल स्थितीत एका ध्येयवेड्या शिक्षकाने त्या गावी जाऊन मुलांची स्वतः अंघोळ घालण्यापासून तर युट्युबवर व्हिडिओ दाखवून स्वच्छतेचे महत्त्व पटविले. यानंतर शिक्षणात त्यांचे मन गुंतवून अक्षरांची ओळख देत त्यांच्या विकासाचा संकल्प करत हा शिक्षक त्यांचा पालक कधी बनला हे कळलेच नाही. 
दीपक पाटील या ध्येयवेड्या शिक्षकाने जामोद (ता. जळगाव) येथे 2005 मध्ये शिक्षण सेवक म्हणून आपल्या सेवेला सुरवात केली. येथे राहून शाळा दुरुस्ती, विद्युतीकरणाचे काम करून घेतले. यानंतर कुऱ्हेपानाचे येथील शाळेत 18 वर्ष सेवा बजाविल्यानंतर जून 2018 मध्ये जोगलखोरी येथील शाळेवर पाटील रूजू झाले. साधारण वर्षभरात शाळेचाच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. 

स्वतः घातली मुलांची अंघोळ 
शाळेत रुजू झाल्यानंतर अंघोळ न केलेले, विस्कटलेले केस आणि अंगावर पुरळ असलेली मुले पाहून कशा पद्धतीने शिकवायचे याचाच विचार होता. मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यापूर्वी स्वच्छतेचे महत्त्व सांगावे या विचारातून युट्युबच्या माध्यमातून क्‍लिप्स्‌चा वापर करत मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. इतकेच नाही तर स्वतः मुलांना अंघोळ घातली. शाळेत "स्वच्छ मुलगा सुंदर मुलगा' असा उपक्रम राबवत नियमित अंघोळ करून येणाऱ्या मुलाचे नाव फळ्यावर लिहायचे त्याच्या खिशाला फूल लावायचे. 

व्हिडीओंद्वारे धडे 
भिल्ल समाजातील मुलांना शिक्षणाची आवड नव्हती. मात्र, मुलांना कार्टून आवडत असल्याने वेगवेगळ्या कार्टून ऍनिमेशनचे व्हिडिओंमधून अक्षर, अंक, संख्या, शब्द, वाक्‍य वाचन करण्यास सुरवात केली. परिस्थितीमुळे मुलांजवळ शैक्षणिक लेखन साहित्य नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून पाट्या, पेन्सिल, वह्या या गोष्टी उपलब्ध करून दिले. 

स्वखर्चातून रंगरंगोटी 
शाळेत दीपक पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका अर्चना महाजन कार्यरत आहेत. शाळेची अवस्था वाईट होती. परंतु, पाटील व श्रीमती महाजन या दोघांनी पंधरा हजार रुपये स्वतः खर्च करून शाळेला आतून व बाहेरून रंगरंगोटी करून घेतली. आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शाळेला लोखंडी जाळीचे कंपाउंड तयार करून घेतले. 

मुलांची जबाबदारीही पेलली 
मुलांना नुसतेच शिक्षण दिले नाही, तर त्यांची जबाबदारी देखील पेलली. गरिबीमुळे मुलांच्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते. त्यामुळे व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून जुने कपडे जमा करून ते मुलांपर्यंत पोहोचविले. गणवेश प्राप्त झाल्यानंतर मुले गणवेशात शाळेत येऊ लागली. माहेश्वरी महिला मंडळ भुसावळ, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ भुसावळ या संस्थांच्या माध्यमातून खेळणी उपलब्ध करून दिली. मुख्य म्हणजे दरवर्षी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या मुलांच्या पालकांना भेटून मुलांना त्यांच्यासोबत न पाठवता गावातच ठेवून घेतले. चार महिन्याकरता मुलांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी देखील पाटील यांनी सांभाळली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com